सर्वच धर्मामधील धर्मगुरूंचा दहशतवाद वाढला असून, त्यांना विरोध करणाऱ्यांना मारून टाकण्यापर्यंत त्यांची मजल जात आहे. सामाजिक चळवळी करणाऱ्यांची तोंडे बंद करण्याचे काम सध्या सुरू आहे. या धर्मगुरूंचा दहशतवाद हेच धर्मसुधारणेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांनी ‘बदलता महाराष्ट्र’ या परिसंवादात व्यक्त केले.
‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांच्या वतीने आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या पाचव्या पर्वात ‘सामाजिक चळवळींचा बदलता चेहरा’ या विषयावर दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यात उद्घाटनाच्या दिवशी तीन सत्रांमध्ये ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’, ‘धर्मसुधारणा आणि आजची आव्हाने’ आणि ‘जातीअंताचा मार्ग कोणता?’ या विषयांवर वक्तयांनी परखड मते मांडली. धर्मसुधारणांवर बोलताना प्रा. बेन्नूर यांनी या समस्येच्या मुळाशी असलेल्या कारणांचा वेध घेतला. या परिसंवादात इतरही वक्त्यांनी स्पष्ट व थेट मते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयाचा ऊहापोह करण्यात आला. श्रद्धेमुळे मूलभूत विचार करण्याची शक्ती मारली जाते. त्यातून माणूस अधिकाधिक दैववादी व कर्तृत्वहीन होतो. त्यामुळे समाजहितासाठी केवळ अंधश्रद्धाच नव्हे, तर श्रद्धाही नाकारणे आपल्या हिताचे आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. शरद बेडेकर यांनी या सत्रात व्यक्त केले. दिवसातील अखेरच्या सत्रात ‘जातीअंताचा मार्ग कोणता’ या प्रश्नाचा विविधांगी वेध घेण्यात आला.
‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी कार्यक्रमामागची भूमिका विषद केली. प्रारंभी सारस्वत बँकेचे अध्यक्ष दिवंगत एकनाथ ठाकूर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.     

आजची सत्रे व वक्ते
वारकरी चळवळ आणि सामाजिक वास्तव
वक्ते- अभय टिळक, भारत पाटणकर, डॉ. सदानंद मोरे
समता की समरसता?
वक्ते- डॉ. बाबा आढाव, भिकूजी इदाते, डॉ. रावसाहेब कसबे
सामाजिक मुद्दय़ांचा राजकारणावरील परिणाम
वक्ते- प्रकाश पवार, विनय सहस्रबुद्धे, सुहास पळशीकर