विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाची साथ सोडत, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच समोरासमोर येत आहेत.  पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी उद्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पुणे विमानतळावर राजशिष्टाचारानुसार त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत. दरम्यान या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा होणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

पुण्यात उद्यापासून पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसीय परिषदेस सुरूवात होत आहे. यासाठी पंतप्रधान मोदी दोन दिवस तर गृहमंत्री अमित शाह तीन दिवस पुण्यात असणार असल्याची माहिती आहे.  विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उद्या पुण्यात असल्याची माहिती मिळाली आहे.

ही तीन दिवसांची परिषद पूर्वनियोजीत होती. देश पातळीवरील ही परिषद असल्याने या अगोदर देशभरातील अन्य शहरांमध्येही ही परिषद पार पडली आहे. तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर व शिवसेनेने एनडीएची साथ सोडल्यानंतर पंतप्रधान मोदी  पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. उद्या रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचे पुणे विमानतळावर आगमन होणार आहे. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विमानतळावर जाणार असल्याची माहिती आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. यानंतर पंतप्रधानांच्या दोन दिवसीय दौऱ्याला सुरूवात होणार आहे.