लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : देशात योग्य वेळी परदेशी पाहुण्यांना बंदी केली असती किंवा त्यांची चाचणी करून त्यांना प्रवेश दिला असता तर भारतात एवढ्या प्रमाणात करोना पसरलाच नसता. भारतात करोना येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. अकोल्यात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. करोना व टाळेबंदीवरून उद्भवलेल्या परिस्थितीवरून त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली.

टाळेबंदीमध्ये १५ कोटी लोकांचे हाल झाले. करोनाची भीती सरकारने आणली. तुम्ही मरणारच आहे, हे जनतेच्या मनावर सरकारकडून बिंबवले गेले. ३० जूनपर्यंत देशातील करोनाबाधितांचा एकूण आकडा पाच लाखापर्यंत जाईल. त्यानंतर टाळेबंदी थांबवण्यात येईल. करोनाबाधितांची संख्या कमी असतांना कडक टाळेबंदी आणि आता रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात जात असतांना टाळेबंदी शिथिल करण्यात येत आहे, हा सर्व प्रकार अनाकलनीय असल्याची खरमरीत टीका अ‍ॅड.आंबेडकरांनी केली.

मूळात टाळेबंदी लागू करणेच चुकीचे आहे. आतापर्यंत साथीने अनेक आजार आले. मात्र, कधी टाळेबंदी लागू करण्यात आली नाही. देशातील जनतेला जगण्याची हिंमत देण्याऐवजी त्यांना भयभीत करीत आहे. आपल्या फायद्याासाठी केंद्र सरकारचे हे षडयंत्र आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजप सरकारने अर्थव्यवस्था बिघडवली. ती सुधारण्याची स्थिती नाही. कंपन्यांना उत्पादन करण्यास सांगण्यात आले असले तरी त्याला खरेदीदार हवा. अन्यथा उत्पादक कंपन्यांवर संपूर्ण भार वाढेल. शाळा सुरु कराव्या की नाही यावरून राज्य सरकार गोंधळलेले आहे. केंद्र राज्यावर, तर राज्य जिल्ह्यावर निर्णय सोडून देतात. शाळांसंदर्भात ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. केंद्र व राज्यात राजकीय नेतृत्वच नाही. निर्णयक्षमतेचा अभाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली. भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीवर भाष्य करतांना, हा प्रकार लक्ष विचलित करणारा असल्याचे ते म्हणाले. यावेळी पत्रकार नरेंद्र बेलसरे यांनी वंचित आघाडीमध्ये प्रवेश घेतला. प्रदेश प्रवक्ते डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना अधिकारच नाही
पीक कर्जासंदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय काढला. तो आदेश राष्ट्रीयीकृत बँका मानत नाहीत. मुख्यमंत्र्यांना तसा अधिकार नाही, असे अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले. अकोला जिल्ह्यात सहकारी संस्थामार्फत सुरू असलेल्या पीक कर्ज वाटप योजनेचा शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.