शहिदांच्या कुटुंबाच्या भावनांची जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्वा असेल, तर भारताचे राष्ट्र प्रमुख या नात्याने त्यांनी १३० कोटी जनतेची माफी मागावी, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. केंद्रा सरकारच्या विरोधात देशव्यापी जन आंदोलन उभारण्याकरता आज चंद्रपूर शहर व ग्रामीण काँगेसतर्फे  ‘शाहिदों को सलाम’ दिवस पाळण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार धानोकरकर म्हणाले,  गेल्या सहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांना १८ वेळा भेटले. मोदीजी आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीगिरीत आपण फार हुशार आहात, तर मग साबरमती आश्रमात झुला झुलुन देखील जिनपिंग यांनी आपल्याला हा धोका का दिला? जे सैनिक देशासाठी शहीद झाले त्यांचा आम्हाला अभिमान आहे. पण ते ज्या कारणांसाठी शहीद झाले ते कारण तुम्ही का लपवत आहात? एवढ्या भेटीगाठी घेऊन देखील आपल्या मैत्रीची कोणतीही तमा चीनने बाळगली नाही. तर, चीनने वेळोवेळी भारताला धोका दिला आहे, ही बाब स्पष्ट असताना देखील आपण आज ही सत्य परिस्थिती कबुल का करत नाही आहात? असा सवाल यावेळी करण्यात आला. तसेच,  भारताचा एक इंच भाग देखील चीनच्या ताब्यात नाही, हा जो खोटेपणा मोदींनी केला आहे. त्यासाठी मोदींनी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देखील करण्यात आली.

येथील गांधी चौक येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार, प्रतिभा धानोरकर, शहर जिल्हा अध्यक्ष रितेश(रामु)तिवारी, महिला जिल्हा अध्यक्ष चित्रा डांगे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले की, पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. सीमेवरील तणावाचे पडसाद देशभर उमटत असून, चीनविरोधात संतापाची लाट उसळत आहे. चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या मागणीने जोर धरला आहे.  चीन संदर्भात आणखी कठोर पाउलं केंद्र सरकारने उचलावी. तसेच, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचे प्रचंड नुकसान होत आहे. देश संकटात आहे, त्या चुकीच्या धोरणाचा, निर्णयाचा निषेध म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी जन आंदोलन उभारण्याकरीता आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे राज्यभरात ‘शहिदों को सलाम’ दिवस आज पाळला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात या घटनेचा सर्वत्र निषेध  नोंदवण्यात येत आहे. चीनला धडा शिकवण्याची ही वेळ आहे. पुढे देखील अशा घटना होऊ नये. कोणाचेही कुटुंब उघड्यावर पडू नये. त्याकरता चीनवर कारवाई करण्याची गरज आहे, असे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.