साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी आज शिर्डीमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरकुल लाभार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला. ११ हजार लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप करण्यात आलं. त्यातील निवडक १० लाभार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींशी संवाद साधण्याची संधी मिळाली. नंदूरबार, नागपूर, सातारा, अमरावती, सोलापूर, लातूर, सातारा आणि ठाणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी मोदींनी संवाद साधला.

सर्वप्रथम नंदूरबारच्या लाभार्थ्यांशी बोलताना मोदींनी मराठीतून त्यांची विचारपूस केली. तुम्हाला हक्काच्या घरात प्रवेश करताना कसं वाटतय ? तुम्हाला कोणाला लाच द्यावी लागली का ? असे प्रश्न मोदींनी त्यांना विचारले. नागरिकांनी यावेळी मोदींना नंदूरबारला येण्याचे निमंत्रण दिले. नंदूरबारला आपण याआधी अनेकवेळा आल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी त्यांनी नंदूरबारच्या प्रसिद्ध चौधरी चहाची आठवण सांगितली. तुम्हाला चौधरी चहा माहिती आहे का ? मी नंदूरबारला आल्यावर चौधरी चहाचा आस्वाद घ्यायचो असे मोदींनी सांगितले.

मोदींनी या लाभार्थ्यांना तुम्हाला लाच द्यावी लागली का ? हा प्रश्न सर्वाधिकवेळा विचारला. प्रत्येकाने नकारार्थीच उत्तर दिले. या प्रश्नाद्वारे आपल्या सरकारच्या राजवटीत कसा भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार सुरु आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मोदींनी केला. तुम्हाला कुठे लाच द्यावी लागली नाही याचे समाधान आहे. दलालाची साखळी संपत चालली आहे त्यामुळे ते त्रस्त आहेत असे मोदी म्हणाले.

आम्ही महिलांच्या नावावर घर दिले त्याचा पुरुषांना राग आला ? असा प्रश्नही मोदींनी विचारला. ठाणे जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधताना त्यांनी कविता म्हणायला सांगितली. कविता म्हणा, लावणी नको असेही मोदी म्हणाले. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गीत-संगीताची साधना केली जाते असे त्यांनी सांगितले. मुले शिकली तर गरिबीच्या विरोधात जी लढाई सुरु केलीय त्याला बळ मिळेल असेही मोदी या महिलांना म्हणाले. सोलापूरकरांशी संवाद साधताना त्यांनी मी गुजरातमध्ये असताना मला सोलापूरमधून जॅकेट बनवून पाठवले जायचे ती आठवण सांगितली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदीजी तुमचे २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचे स्वप्न आम्ही २०१९मध्येच पूर्ण करु असे आश्वासन दिले. साडेचार लाख घरकुलांच बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात २०१ तालुक्यात कमी पाऊस झाला असून दुष्काळाची शक्यता आहे असे फडणवीस म्हणाले. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठिशी उभे राहिल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. नगर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करु असे फडणवीस म्हणाले. गरीबांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी तुम्ही ज्या योजना आणल्या त्या सर्व योजना महाराष्ट्र पूर्ण करेल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.