विद्यापीठ आणि उच्चशिक्षण क्षेत्रात अनेक महत्वाची पदे भूषवलेले डॉ. बी.एम.उपाख्य संतोष ठाकरे यांना संस्थेने प्राचार्यपदावरून निलंबित केल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
अमरावतीच्या अस्मिता शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयात प्राचार्य असलेले डॉ. संतोष ठाकरे अमरावती विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर सदस्य आहेत. शिवाय, विद्यापीठाच्या समाजविज्ञान शाखेचे अधिष्ठाताही आहेत. ‘नुटा’ विरोधात त्यांनी ‘सुक्टा’ ही प्राध्यापकांची संघटना उभी करून विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर ‘सुक्टा’चे अनेक उमेदवार आणले होते. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून त्यांनी विधान परिषदेची निवडणूकही लढली होती. विद्यापीठ वर्तुळात महत्वाच्या प्राधिकरणावर प्राचार्य प.सि.काणे यांचा पराभव करून निवडून आल्याने संतोष ठाकरे एकदम चच्रेत आले. हळूहळू त्यांनी विद्यापीठ वर्तुळात झुंझार अधिष्ठाता, असा नावलौकीक कमावला. केंद्र सरकारात वस्त्रोद्योग मंडळावरही त्यांनी काम केले आहे. अलीकडेच लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीनिमित्य आयोजित परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अमर्त्य सेन यांच्यासोबत बसण्याची संधी त्यांना लाभली होती.
संस्थेने त्यांच्यावर प्राध्यापकांशी नीट न वागणे, संस्थेच्या परवानगीशिवाय अनेक उपक्रम घेणे, सुटय़ा मंजूर करणे, मागील तीन वषार्ंपासून खर्चाचे अंकेक्षण न करणे, अशा स्वरूपाचे आरोप ठेवून प्राचार्यपदावरून निलंबित केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, ज्या संस्थेत ते प्राचार्य आहेत त्या संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मुरलीधर भोंडे हे त्यांचे श्वसूर असून त्यांच्या सासूबाई प्रा.डॉ. कमल भोंडे उपाध्यक्ष, तर मेहुणे प्रा. भोंडे सदस्य आणि पत्नी प्रा.डॉ. मीनल ठाकरे कोषाध्यक्ष आहेत. प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांसाठी विद्यापीठ प्राधिकरणापासून तर न्यायालयापर्यंतच्या लढाया लढलेल्या डॉ. संतोष ठाकरे यांना आता स्वतचीच लढाई लढावी लागत आहे. निलंबनासंबंधी विचारल्यावर ते म्हणाले की, विद्यापीठ कायदा, अध्यादेश, परिनियम अथवा अशा कोणत्याही प्राध्यापक किंवा प्राचार्याना निलंबित करण्याचा अधिकारच मुळात संस्थेला नाही.
आपले निलंबन घटनाबाह्य़, अवैध, बेकायदेशीर आणि मनमानी स्वरूपाचे आहे.

अधिष्ठातापदाला बाधा नाही
डॉ. संतोष ठाकरे यांना संस्थेने निलंबित केल्यामुळे त्यांचे विद्यापीठातील विविध प्राधिकरणांवरील सदस्यत्व आणि अधिष्ठातापद संपुष्टात येते काय, असा प्रश्न विचारला असता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अजय देशमुख म्हणाले की, विद्यापीठासमोर अजून तरी त्यांच्या निलंबनाचा संस्थेचा आदेश प्राप्त नाही. सोमवारी डाक पाहिल्यानंतरच भाष्य करता येईल. माजी कुलसचिव डॉ. सी.डी. देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठ कायद्याप्रमाणे एखाद्याचे प्राधिकरणावरील सदस्यत्व ती व्यक्ती ज्या प्रवर्गातून प्राधिकरणावर आली आहे आणि तेथे त्याची सेवामुक्ती झाली असेल तरच आपोआप रद्द होते. निलंबनामुळे सदस्यत्व रद्द होत नाही.