इयत्ता सातवीत शिकणाऱ्या सात मुलींचा मुख्याध्यापकानेच विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील कोटमगाव (विठ्ठलाचे) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी तक्रार केल्याने गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी कोटमगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मधल्या सुटीनंतर विज्ञान विषय शिकविणारे मुख्याध्यापक वाल्मिक वाघ यांनी मुख्याध्यापक कार्यालयात सात विद्यार्थिनींना बोलावून वयाप्रमाणे शरीरात होणाऱ्या बदलांविषयी काही प्रश्न विचारले. या वेळी त्यांनी विद्यार्थिनींच्या शरीराला स्पर्श करीत अश्लील वर्तन केले. एका विद्यार्थिनीने यासंदर्भात पालकांना माहिती दिल्यानंतर या पालकांनी इतर मुलींच्या घरी चौकशी केली असता या प्रकारात तथ्य आढळून आले. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापक गैरहजर राहिला. गुरुवारी पीडितांच्या पालकांनी आणि ग्रामस्थांनी मुख्याध्यापकास खोलीत कोंडले. तसेच शाळेला कुलूप ठोकले. मुख्याध्यापकाविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 14, 2015 4:13 am