सध्या विविध माध्यमांवर उच्चभ्रु समाजाचा पगडा असल्याने दीनदलित, गरीबांचे प्रश्न समोर येत नाहीत. या अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांचा आवाज कुठेतरी क्षीण होत आहे. टीआरपी वाढविण्याचा प्रयत्न सर्व स्तरातून होत असतो. मात्र या सर्वात मुद्रीत माध्यमे अजून तग धरून असून काही अंशी का होईना त्यात वंचितांच्या प्रश्नांना स्थान मिळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व विचारवंत अच्युत गोडबोले यांनी केले.
येथील कॉम्रेड नरेंद्र (नाना) मालुसरे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने देण्यात येणारे दीपस्तंभ पुरस्कार सोमवारी परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यावेळी गोडबोले यांनी समाजासाठी काही तरी वेगळे, परंतु विधायक काम करणाऱ्यांचा सत्कार हे या पुरस्कार सोहळ्याचे वेगळेपण उसल्याचा उल्लेख केला. आज विविध माध्यमांव्दारे उच्चभ्रु श्रीमंतीचे दर्शन घडविले जात आहे. त्यात झोपडपट्टी, कामगार वस्तीतील आम आदमी कुठेच दिसत नाही. त्याचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्याचा एकांगी सुरू असलेला लढा यांना त्यात स्थानच नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या बातम्यांमध्ये असेच काहीसे रवंथ होत असते. या बातम्यांमधील रात्रीच्या विविध चर्चासत्रात कोण अधिक भ्रष्टाचारी हे दाखविण्याची जणुकाही अहमहमिका सुरू असते. आज समाज माध्यमांमुळे माहितीची देवाण घेवाण होत आहे. मात्र यात संवाद हरवला आहे. लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याची जाणीव कोणाला नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. जीवा पांडु गावीत होते. संस्थेचे पदाधिकारी अ‍ॅड. जयंत जायभावे, अनुराधा मालुसरे, संजय मालुसरे यांसह श्रीधर देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. आदिवासी क्षेत्रातील किसान कार्यकता म्हणून पुणे जिल्हयातील घाटघरचे नाथा शिंगाडे, आदर्श कामगार पुरस्कार सीटू कामगार चळवळीतील विजय पवार, ‘दिव्य मराठी’ चे प्रशांत पवार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आदर्श शिक्षण संस्था म्हणून दापोली तालुक्यातील लोकमान्य टिळक विद्यामंदिरच्या वतीने रेणू दांडेकर, राजाराम दांडेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. वैयक्तीक गटासाठी ११ हजार रूपये, शाल, स्मृतीचिन्ह, मानपत्र व पुस्तक तसेच संस्थेसाठी २५ हजार रुपये, शाल, स्मृतीचिन्ह, पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारार्थीच्या वतीने मनोगत व्यक्त करताना डॉ. दांडेकर यांनी नाना मालुसरे यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलु उलगडले. सध्या सर्वत्र इंग्रजी शिक्षण पध्दतीचे गोडवे गायले जात असले तरी यातून मुलांना व्यवसाय वा आत्मनिर्भर होणारे कुठले शिक्षण मिळते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमच्या शाळेत मूलभूत शिक्षण कौशल्यावर भर दिल्याने मुलांमध्ये उद्योजकता निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशांत पवार यांनी प्रज्ञा पवार यांची कविता सादर केली.