नाशिक येथील करन्सी नोट प्रेसने (सीएनपी) मागील १५ दिवसांत नोटांची छपाई ४० टक्क्यांनी वाढवून ५०० रूपयांची सुमारे ८ कोटी नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) सुपूर्द केले आहेत. सिक्युरिटी प्रिटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एसएमपीसीआयएल) प्रत्येक दिवशी १ कोटी नोटांऐवजी १.४ कोटी नोटा छापत आहे. गेल्या काही दिवसांत देशातील अनेक भागात नोटांचा तुटवडा झाल्याचे पाहताच हा बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरबीआयने नोव्हेंबर २०१७ ते एप्रिलच्या मध्यापर्यंत २०१८ पर्यंत प्रेसला कोणतीही नवीन ऑर्डर दिली नव्हती. त्यामुळे ५०० रूपयांच्या नोटांची छपाई केली जात नव्हती. आरबीआयकडून नवीन डिझाइनची प्रतिक्षा करत असलेल्या प्रेसने एप्रिलपासून १०० आणि २० रूपयांच्या नव्या नोटाही छापलेल्या नाहीत. २०० रूपयांच्या नोटांच्या छपाईची ऑर्डर मध्य प्रदेशमधील प्रेसला देण्यात आल्यामुळे त्या नोटाही नाशिकमधून छापले जात नाहीत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या मध्यात ५०० रूपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरू करण्यात आली आहे. बाजारात जाण्यासाठी या नोटांना एका आठवड्यापेक्षा जास्त काळ लागला. आता प्रत्येक दिवशी ५०० रूपयांच्या ८० लाख नोटा छापल्या जात आहेत. काही दिवसांतच हे प्रमाण दिवसाला १.२ कोटी नोटांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.