शासनातर्फे रत्नागिरी जिल्ह्य़ात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून जिल्ह्य़ाची नैसर्गिक साधनसंपत्ती लक्षात घेऊन पर्यटन आणि बंदर विकासावर विशेष भर दिला जाणार असल्याचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी नमूद केले.
येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित ५३ व्या महाराष्ट्र दिन समारंभात जाधव बोलत होते. जिल्हा परिषदेने पंचायत सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त करून पालकमंत्री म्हणाले की, शासनाच्या अनेक योजना जिल्ह्य़ामध्ये राबवल्या जात असून त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. याचबरोबर जिल्ह्य़ाच्या पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा बनवण्यात येत आहे. पर्यटनस्थळी पोहोचण्याच्या दृष्टीने उत्तम रस्ते तयार करण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. मत्स्योत्पादन हा जिल्ह्य़ातील महत्त्वाचा उद्योग असल्यामुळे त्यासाठी उपयुक्त आधुनिक पद्धतीने बंदरांचा विकास केला जाणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या पुढाकाराने राबवल्या जात असलेल्या स्वच्छता मोहिमेचा उल्लेख करून पालकमंत्र्यांनी ही मोहीम अन्य जिल्ह्य़ांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच क्रीडा, शिक्षण, शासकीय सेवा इत्यादीमध्ये नैपुण्य दाखवणाऱ्या खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
अप्पर पोलीस अधीक्षक ठाकूर यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह
पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल येथील अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जिल्हा पोलीस अधीक्षक दीपक पांडे यांच्या हस्ते देण्यात आले.
राज्यात कोल्हापूर, ठाणे, सोलापूर इत्यादी ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून ठाकूर यांनी काम पाहिले असून गोंदिया जिल्ह्य़ातील नक्षलग्रस्त भागात स्थानिक जनतेशी संवाद निर्माण करण्यासाठी त्यांनी राबवलेल्या योजनेचा राज्य आणि केंद्र सरकारकडून यापूर्वी गौरव करण्यात आला आहे.