मंगळवेढा येथील उप-कारागृहात एकाचवेळी २८ कैदी करोनाबाधित झाल्याची आणि त्यापैकी तीन बाधित कैद्यांचे पलायन नाट्य ताजे आहे. अशातच उप-कारागृहातील एका कैद्याला उपचाराच्या नावाखाली तेथून बाहेर काढून त्याची गावी नेण्यात आले आणि तेथे पार्टी करण्यात आली. नंतर मात्र तो कैदी करोनाबाधित निघाल्याचे दिसून आल्यानंतर सर्वांची झोप उडाली. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संबंधित दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच ४० जणांविरूध्द गुन्हाही दाखल झाला आहे.

बजरंग माने व उदय ढोणे अशी या प्रकरणात निलंबित झालेल्या दोघा पोलिसांची नावे आहेत. हे दोघेही मंगळवेढा पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. मंगळवेढा उप-कारागृहात खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला तानाजी बळीराम भोसले याला आजार असल्याचे निमित्त पुढे करून मंगळवेढा सरकारी रूग्णालयात उपचार करण्याच्या नावाखाली कारागृहातून बाहेर काढण्यात आले. कारागृहापासून सरकारी रूग्णालय केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.

भोसले यास पोलीस कर्मचारी बजरंग माने व उदय ढोणे यांनी एका खासगी वाहनातून रूग्णालयाऐवजी त्याच्या स्वतःच्या आंबे गावात नेले. तेथे कैदी भोसले याच्यासह ४० जणांनी मिळून पार्टीदेखील केली. यात पोलीस कर्मचारी माने व ढोणे यांनाही सहभागी करून घेण्यात आले. पार्टीची मजा लुटल्यानंतर उशिरा कैदी भोसले यास मंगळवेढ्यात आणून तेथे रूग्णालयात नेण्यात आले. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त होताच चौकशीचे आदेश देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय पाटील यांनी संबंधित दोन्ही पोलिसांच्या मोबाइलचा सीडीआरचा तपशील तसेच संपूर्ण कागदपत्रे व पुरावे मिळवून सखोल चौकशी केली असता या प्रकरणाची उकल झाली.

या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचारी बजरंग माने व उदय ढोणे यांचे वर्तन बेजबाबदार आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्यामुळे त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब अशी की, ज्या कैद्याला कारागृहातून बाहेर काढून त्याच्या गावी नेऊन पार्टी करण्यात आली, तो कैदी तानाजी भोसले हा नंतर करोनाबाधित आढळला. ही बाब समोर येताच त्याच्या सोबत पार्टी करणाऱ्या सर्वांची झोप उडाली. तर दुसरीकडे या सर्वाविरूद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आणखी पाच कैदी बाधित

दरम्यान, मंगळवेढा उप-कारागृहातील २८ कैद्यांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आणखी पाच कैदी बाधित आढळून आले. त्यामुळे बाधित कैद्यांची संख्या ३३ झाली आहे. अन्य दोन कैद्यांचा करोना चाचणी अहवाल प्रलंबित आहे.