23 February 2019

News Flash

नाणारला आंधळा विरोध नाही -पृथ्वीराज चव्हाण

कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकार पारदर्शक नाही.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकार पारदर्शक नाही. प्रदूषणाचा कोकणवासीयांवर काय परिणाम होईल, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि नाणार प्रकल्पातील कमी अंतरामुळे भविष्यात निर्माण होणारे धोके, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. जोवर त्याचे उत्तर  केंद्र व राज्य  सरकारकडून  मिळत नाही, तोवर काँग्रेसचा प्रकल्पाला विरोध कायम राहील, असे ठाम मत  काँग्रेस नेते व  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

चव्हाण यांनी गुरुवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी वादग्रस्त नाणार प्रकल्पासह इतरही मुद्यांवर मते मांडली.  राज्याच्या विस्कटलेल्या आर्थिक घडीवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले.  नाणार प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध राजकीय नाही तर त्याला तार्किक आधार आहे. स्थानिक लोकांचे जीव धोक्यात घालून हा प्रकल्प आम्ही कधीही होऊ देणार नाही. सरकार या प्रकल्पाची माहिती लपवत आहे. प्रकल्पामुळे  प्रदूषण किती किलोमीटर परिसरात होणार आहे या विषयी केंद्र व राज्य सरकार कोणतीही माहिती देण्यास तयार नाही.  सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प  व  या प्रस्तावित  प्रकल्पातील अंतर सा गरी मार्गाने  दोन किलोमीटरपेक्षा कमी असल्याने धोक्याची शक्यता वर्तवली आहे. जगात अशाप्रकारचे दोन प्रकल्प इतक्या कमी अंतरावर कुठेच नाहीत. नाणारचे महाराष्ट्राला होणारे फायदे-तोटे आणि या प्रकल्पाच्या अटी-शर्ती सरकारने आधी स्पष्ट कराव्यात, त्याशिवाय हा प्रकल्प पुढे रेटण्याच्या अट्टाहास करू नये, अशी कॉँग्रेसची भूमिका असल्यामुळे या प्रकल्पाला आम्ही विरोध करीत आहोत, असे चव्हण  यांनी सांगितले.

केंद्रातील मोदी सरकार मुंबईतील महत्वाच्या आर्थिक संस्था गुजरातमध्ये पळवून नेते आणि प्रदूषणकारी  प्रकल्पासाठी कोकण किनारट्टीची निवड केली जाते. कोकण किनारपट्टय़ात लोकवस्ती अधिक आहे. त्याउलट गुजरातमधील सौराष्ट्रची किनारपट्टी निर्मनुष्य आहे. तेथे हा प्रकल्प नेता आला  असता. त्यामुळे वाहतूक खर्चात  थोडी वाढ झाली असती, परंतु हजारो लोकांना होणारा प्रदुषणाचा त्रास वाचला असता, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

चला खड्डे मोजू या! – काँग्रेसचे आंदोलन

राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मुंबईत ‘चला खड्डे मोजू या’, असे अनोखे आंदोलन करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या गलथान गारभारामुळे या महानगरांतील सर्व रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे,  मुंबईकरांना त्याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे, महापालिकेला मात्र त्याचे कसलेही गांभीर्य नाही, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.

मुंबईतील सर्व खड्डे महापालिका बुजविणार नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या विभागात खड्डे मोजा आणि बुजवा हे आंदोलन चालूच राहील, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.  राज्य सरकारआणि महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना मुंबईकरांना भेडसावणाऱ्या खड्डय़ांच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. मुंबईकरांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि झोपलेल्या भाजप सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसला खड्डे मोजा हे अनोखे आंदोलन करावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबईतील शीव-प्रतीक्षानगर येथून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी येथील खड्डय़ांची छायाचित्रे काढून नंतर त्यात भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचे फूल  टाकून ते खड्डे बुजविण्यात आले.

First Published on July 13, 2018 1:19 am

Web Title: prithviraj chavan 4