माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर कराडच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रचारासाठी पृथ्वीराजबाबा गल्लोगल्ली फिरले. चव्हाणांना मानणारे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले, पण नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला. तेथेच चित्र बदलले आणि पृथ्वीराजबाबांना मानणाऱ्या नगरसेवकांचा गट आता भाजपच्या जवळ गेला आहे.

कराड पालिकेत नगराध्यक्ष जरी पृथ्वीराजांचे नेतृत्व मानणारा नसला, तरी बहुमत असल्याने त्या माध्यमातून सकारात्मक राजकारण करण्याची संधी काँग्रेसला मानणाऱ्या जनशक्ती आघाडीला निश्चित होती. मात्र, डॉ. अतुल भोसले या मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील भाजप नेत्याला संपूर्ण आघाडी गळी पडल्याचे बोलले जात आहे.

मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावरील कारवाईसाठी पृथ्वीराजांना नव्हेतर थेट भाजप नेत्यांना साकडे घालून जनशक्ती आघाडीच्या सदस्यांनी मार्गदर्शक नेताबदलाचे संकेत दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये शहरी जनतेने भाजपला स्वीकारण्याची भूमिका घेतली. तर, ग्रामीण भागातही भाजपने चंचुप्रवेश केला. कराड पालिकेच्या आठ महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती आघाडीला २९ पैकी १६ जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, ६ जागांसह भाजपाच्या रोहिणी उमेश शिंदे या नगराध्यक्षपदी मोठय़ा मताधिक्याने विजयी झाल्याने पृथ्वीराज चव्हाणांच्या राजकारणाला घरच्या मैदानावरच मोठा धक्काही बसून गेला. भाजपकडे नगराध्यक्षपद असताना, बहुमत नसल्याने पालिकेच्या सभागृहात कायद्याचा कस लागून नगराध्यक्षांच्या अनेक निर्णयांवर काँग्रेसच्या मानल्या जाणाऱ्या जनशक्तीच्या बहुमताकडून आक्षेप नोंदवले जातील. तर, बहुमताच्या जोरावर रेटले जाणारे निर्णय नगराध्यक्षा आपल्या अधिकारात फेटाळतील आणि सभागृहात सत्तेविरुद्ध बहुमत की बहुमताची सत्ता अशा गणिताच्या पाश्र्वभूमीवर कायद्याचा व अधिकाराचा नक्कीच कस लागेल अशी अपेक्षा होती. यापूर्वी शारदा जाधव नगराध्यक्षा असताना, त्यांना बहुमताअभावी सभागृहात नमते घ्यावे लागत होते. परंतु, सध्याचा राजकीय साठमारीत पालिका सभागृहात सत्ताधारी कोण? आणि विरोधक कुठे आहेत हे शोधावे लागत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे कारभारी म्हणून भूमिका बजावणारे पालिकेचे मातबर सदस्य व पदाधिकारी कारवाईचे गंडांतर नको म्हणून, भाजपाशी जवळीक करून आहेत.

मानापमान व मनमानी कारभाराच्या मुद्दय़ावरून मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचे विरोधात सारे पदाधिकारी, सदस्य आणि सर्वच पालिका कर्मचारी एकवटले असे चित्र गेल्या अनेक महिन्यांपासून उभे आहे. या संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी व जनशक्तीचे आधारवड म्हणून त्या १६ सदस्यांनी पृथ्वीराज चव्हाणांकडे आपली गाऱ्हाणी मांडणे उचित होते. परंतु, बहुमताच्या या गटाने व भाजपसह अन्य सदस्यांनीही पृथ्वीराजांऐवजी भाजपचा आधार घेणे पसंत केले. परिणामी आजमितीला चव्हाणांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित एक महिला सदस्या वगळता सारेच भाजपच्या वळचणीला असल्याचे राजकीय वर्तुळाचे म्हणणे आहे. अशातच सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे स्वपक्षीय राष्ट्रवादीविरुद्ध टोकाची भूमिका घेऊन भाजपच्या वाटेवर असल्याचा बोलबाला आहे. तसे झाल्यास कराडमधील माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या गटाबरोबरच भाजपमध्ये जाणाऱ्यांचा लोंढा राहणार असल्याचे राजकीय गणित बांधले गेले असल्याचे संकेत आहेत.

खरे तर नगराध्यक्षांकडे बहुमत नसल्याने त्यांच्या एकूणच कारभारावर अंकुश ठेवून ‘जनशक्ती’ने कारभार करायला हवा होता. परंतु, साऱ्यांनाच मुख्याधिकारी हटाव आणि सत्तेचा हव्यास यामुळेच की काय, शहराच्या विकासाचेही घेणे-देणे नसल्याचे शहराच्या एकूणच अवस्थेवरून स्पष्ट होत आहे. अनारोग्याची स्थिती, रस्त्यात खर्ची पडलेल्या रकमेची झालेली माती, खड्डय़ांबरोबरच स्पीडब्रेकरची डोकेदुखी, वाहतूक कोंडीचा प्रश्न, रेंगाळलेले प्रकल्प आणि गैरकारभाराचे आरोप हे मुद्दे घेऊन आता, पृथ्वीराज चव्हाणांनाच विधानसभेत आपल्या शहराची आणि मतदार जनतेची गाऱ्हाणी मांडावी लागतील, अशी कराडची अवस्था आज झाली आहे.

मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर कोरडे ओढत अगदी त्यांच्या बदलीसाठी आटापिटा करण्यात सध्या अवघी नगरपालिका अर्थात सर्व पदाधिकारी व सेवकवर्ग गुंतला आहे. आंदोलने, उपोषणे असे मार्गही चोखाळण्यात आले. परंतु, हा विनायक आपली कराड पालिकेतील मांड काही सोडेना. यातूनच मग ‘औंधकर हटाओ’ म्हणणारे कराडकरांच्या प्रश्नांवर शासनदरबारी असे आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. या साऱ्या घडामोडीवर लक्ष वेधून असलेले पृथ्वीराज चव्हाण पालिकेतील सारे सैन्य गमावल्याने काय भूमिका घेणार? आणि राजकारणाची बैठक घट्ट कशी करणार? हे हळूहळू स्पष्ट होईल आणि त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. आपल्या गटाचे नगरसेवक विरोधी गटाच्या जवळ गेल्याने पृथ्वीराजबाबांनी काही सदस्यांना अपात्र ठरविण्याकरिता आपली शक्ती पणाला लावल्याची चर्चा जोरात आहे.