विद्यमान सरकार अवघ्या महाराष्ट्राचा विकास सोडून केवळ विदर्भाचा विकास साधत आहे. विदर्भाचा विकास झाला म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही. परंतु त्यापोटी पश्चिम महाराष्ट्राचा विकास थांबवणे निश्चित चुकीचे असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

काले (ता. कराड) येथे जनविकास योद्धा प्रतिष्ठान व पहिलवान नानासाहेब पाटील मित्रपरिवाराच्या वतीने कडबाकुट्टी मशिनच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्यामराव पाटील होते. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, कराड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर उपस्थित होते.  पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की मला काही दिवसांपूर्वी पहिलवान नाना पाटील यांनी गावच्या विकासकामांची यादी दिली. तालुक्यातील खूप मोठे काले हे गाव स्वावलंबी आहे. पण सोयीसुविधांचा अभाव असल्याने त्या उभ्या करण्यासाठी सर्वानी एकत्रित येण्याची गरज आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट झालेली कामे परत जात नाहीत. याची प्रचिती तुम्हाला आली आहे. तालुक्यातील मंजूर विकासकामांबाबत सुरुवातीला गैरसमज पसरवला गेला. परंतु ती कामे हळूहळू सुरू झाली आहेत. आमच्या सरकारच्या काळातील अनेक योजना नवीन सरकारने बंद केल्या आहेत. सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रमही त्यांनी इतरत्र विलीन केला आहे. काले ते नारायणवाडी रस्त्याचे कामही सरकारच्या आडमुठय़ा धोरणामुळे अडकून पडले आहे, पण रस्त्याचे काम पूर्ण करणारच. तालुक्यातील १८३ धोकादायक शाळा खोल्यांचा प्रस्ताव पाठवून याबाबत नवीन खोल्या मिळाव्यात म्हणून माझा पाठपुरावा सुरू आहे. खूप पाठपुरावा केल्यामुळे जिलत २०० शाळा खोल्या मंजूर झाल्या आहेत. शेतीत यांत्रिकीकरण केले पाहिजे. तंत्रज्ञानयुक्त अचूक शेती केल्यास पुढील १० ते २० वष्रे शाश्वत उत्पन्न शेतकरी घेऊ शकणार आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीवरील रोजगाराचा भार कमी होईल. पहिलवान नाना पाटील म्हणाले, की जनविकास योद्धा प्रतिष्ठान व मित्रपरिवाराने ४० टक्के स्वनिधी उभा करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी मशीन दिल्या आहेत.