माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा आरोप
काँग्रेस आघाडी सरकारने त्या वेळच्या दुष्काळात शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवल्या होत्या. यंदाच्या दुष्काळात मात्र नेमके शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्यात आले असून, त्यामुळे दुष्काळ निवारणात या राज्य सरकारला साफ अपयश आल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सरकारच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे, असे ते म्हणाले.
गुरुवारी बीडला जाताना चव्हाण नगर तालुक्यातील टाकळीकाझी या गावात अचानक थांबले होते. येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. चव्हाण म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही तातडीची मदत दिला. त्या वेळी केंद्रातही काँग्रेसचे सरकार होते. राज्य व केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका घेतली होती. यंदा एकीकडे दुष्काळाची तीव्रता आणखी गंभीर आहे आणि दुसरीकडे राज्य केंद्र सरकारला मात्र त्याचे अजिबात गांभीर्य नाही. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन विविध योजना राबवण्याची नितांत गरज असताना राज्य सरकार त्यात अपयशी ठरले आहे. जनावरांच्या छावण्यांसाठी अतिशय क्लिष्ट अटी लादण्यात आल्या आहेत.
आघाडी सरकारच्या काळात मंत्री व आघाडीचे आमदार-खासदार यांनीही जनतेत जाऊन त्यांच्या पातळीवर दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम केले, त्यांना धीर दिला. तसे काहीच आता होत नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे. सद्य:स्थितीत जगायचे कसे, याचीच चिंता शेतकऱ्यांना आहे. जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी लादलेल्या क्लिष्ट अटी पाहता त्याचा आधार मिळण्याऐवजी इच्छुक छावणीचालक व शेतकऱ्यांचीही दमछाक झाली असून, त्याचा मोठा फटका दूध उत्पादकांना बसला आहे. एकीकडे दुधाचे भावही कोसळले आहेत. आघाडी सरकारने छावण्यांबाबत उदार धोरण घेतानाच दुधाचे दर उतरणार नाहीत, याचीही काळजी घेतली होती, असे चव्हाण यांनी सांगितले. शेतकरी टिकला पाहिजे, पशुधन वाचले पाहिजे, अशी आघाडी सरकारची भूमिका होती, मात्र आता या सगळय़ाच गोष्टींकडे मुख्यमंत्री व केंद्र सरकारचेही साफ दुर्लक्ष आहे, असे चव्हाण म्हणाले.