15 October 2019

News Flash

पुलवामा हल्ला प्रकरणाची चौकशी करणार का?

पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधानांना सवाल

पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधानांना सवाल

पुलवामा अतिरेकी हल्ला प्रकरणातील गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची चौकशी करण्याची हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवतील का, असा सवाल काँग्रेसचे नेते व  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस सत्तेवर आल्यावर राफेलसह केंद्रातील मोदी सरकारच्या व राज्यातील फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारासाठी चेंबूर यथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा विकास आराखडा दोनदा बदलला. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या विकास आराखडय़ातील दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करेल, असे चव्हाण म्हणाले.

पुलवामाचा हल्ला हे कारगिलप्रमाणेच आपल्या गुप्तचर संस्थेचे अपयश असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मात्र कारगिल युद्ध समाप्तीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. वाजपेयी यांच्याप्रमाणे पुलवामा हल्ला प्रकरणातील गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची चौकशी करण्याची हिंमत मोदी दाखवणार का, असा सवाल त्यांनी केला. नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मुंबईत झालेले एखादे मोठे काम दाखवून द्यावे, असे आव्हानही चव्हाण यांनी यावेळी दिले.

First Published on April 22, 2019 1:21 am

Web Title: prithviraj chavan comment on pulwama attack