केवळ पैसा आणि सत्तेच्या दहशतीवर भाजपने कर्नाटक सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कराडनजीकच्या गोवारे येथे विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, काँग्रेसमधून आलेल्यांना थेट मंत्रिपदे देऊन भाजपने राजकीय भष्ट्राचार  केला आहे. २००३ साली अटलबिहारी वाजपेयी यांनी ९१ घटनादुरुस्ती केली. त्यामध्ये एखाद्या आमदाराने राजीनामा दिल्यानंतर त्यांना पक्षांतर करता येणार नाही. तो आमदार पुन्हा निवडून आल्यानंतर मंत्रीपद देऊ शकता. परंतु, भाजपने ही घटना मोडून त्यांच्या पक्षात येणाऱ्यांना मंत्रिपदं दिली. भाजपकडून साम, दाम व दंडाचा वापर होत असल्याची टीका करताना हे लक्षात घेऊन बहुजन समाजाने आपले स्वहित जाणून वाटचाल करावी असे आवाहन चव्हाण यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत भाजपने सत्ता व पैशाचा पाशवी वापर केला. धार्मिक ध्रुवीकरण केले. याहीपलिकडे महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले. सध्याच्या मतदान प्रणालीमध्ये दोष आहेत. याबाबत न्यायालयीन लढाया चालू आहेत. परंतु, पुढील निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची आमची आग्रही मागणी असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, विकासाच्या वल्गना व भूलथापा देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. काही भागात विकासाच्या केवळ घोषणा झाल्या. परंतु, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराजबाबांनी घोषणा न करता कामे केली. आमदार आनंदराव पाटील यांचेही भाषण झाले.