पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

कोल्हापूर : केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचा विकास दर कमी झाला आहे. सरकारी धोरणे चुकीची असल्याने राज्याचा आणि देशाचा विकास होत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

ऐनापूर (ता.गडहिंग्लज) ग्रामपंचायतीला यशवंत ग्रामपंचायत व यशवंत सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार सोहळय़ात ते बोलत होते. शिवराज विद्या संकुलचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते.

राज्यात कृषी व बेरोजगारीचे प्रचंड मोठे संकट उभे राहिले आहे. सरकारने केवळ खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. संपूर्ण जगाच्या तुलनेत आज देशात अपेक्षित प्रगती होत नाही.  केवळ जाहिरातबाजी करून देश चालवता येत नाही असा टोला चव्हाण यांनी या वेळी लगावला.

सरसकट कर्जमाफी असे सांगत शेतकऱ्यांची फसवणूक चालूच आहे, असा आरोप करून चव्हाण म्हणाले, शेतकरी प्रचंड संकटात अडकला आहे.  काँग्रेसच्या सत्ताकाळात ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आढेवेढे न घेता दिली. त्यासाठी कोणत्याही अटीशर्ती घातल्या नाहीत. या सरकारचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.

बेरोजगारीने युवक त्रस्त आहेत. वर्षांला दोन कोटी सोडा, दोन लाख नोकऱ्यासुद्धा निर्माण करू शकले नाहीत.