News Flash

सनातन संस्थेला कोणाचा राजाश्रय?-पृथ्वीराज चव्हाण

सत्ताधाऱ्यांना कोणताही प्रश्न हाताळता न आल्याने बेरोजगारी वाढली असून राज्याचा विकास खुंटला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : हिंदुत्ववादी संघटना सनातन संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी करणारे पत्र केंद्र सरकारकडे २०११ मध्येच आपण मुख्यमंत्री असतांना दिले होते. केंद्र सरकारने त्यावर कुठलीच कारवाई केली नाही. सनातन संस्थेच्या अनेक पोटसंस्था आहेत. त्यांना राजाश्रय कोणाचा, विध्वंसक सामान खरेदीसाठी पैसे कोठून येतात, या सर्वाची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यशैलीवर चौफेर टिकास्त्र सोडले. आगामी निवडणुका सत्ताधारी पैशांचा गैरवापर, जातीय ध्रुवीकरण अशा जोड-तोड मुद्यांवर लढेल. जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने कितपत पूर्ण झालीत याची उत्तरे त्यांच्याकडे नाही. सत्ताधाऱ्यांना कोणताही प्रश्न हाताळता न आल्याने बेरोजगारी वाढली असून राज्याचा विकास खुंटला आहे. आरक्षण असो किंवा अन्य कुठलाही मुद्दा याविषयी सरकारकडे स्पष्टता नाही. सत्तेत येण्याआधी जाहीरनाम्यात भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र मागील अधिवेशनात सत्ताधारी मंत्र्यांचे काही घोटाळे उघडकीस आले. राफेल घोटाळा, बुलेट ट्रेन अश्या अनेक विषयांविषयी बोलण्यास कोणीही तयार नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दाही सरकारला हाताळता आला नाही. केवळ चालढकल आणि टाळाटाळ केल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

काँग्रेसने आरक्षणाविषयी कायदा आणला, परंतु विद्यमाना सत्ताधाऱ्यांना न्यायालयात बाजू मांडता न आल्याने आरक्षणाच्या कायद्याला स्थगिती मिळाली आहे. सरकार मागासवर्गीय आयोगाकडे बोट दाखवत आहे. वास्तविक आयोग हा न्यायिक  प्रक्रियेचा भाग असल्याने तेथे दोन्ही बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. त्या निकालानंतर पुढे काय याचे उत्तर सरकारकडे नाही. आज परिस्थिती गंभीर असून मुख्यमंत्र्यांना मुंबई सोडता येत नाही अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच पातळीवरील अस्थिरता पाहता  मुख्यमंत्री बदलाची चर्चा सध्या सुरू आहे. आगामी निवडणुकांमध्ये मोदींची हिटलरशाही जावी यासाठी ‘संविधान बचाव-मोदी हटाव’ अभियान हाती घेण्यात आले आहे. हुकूमशाही कारभार बंद करण्यासाठी काँग्रेस सर्व विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवसेना-भाजप आघाडी होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2018 4:12 am

Web Title: prithviraj chavan hit ruling party over sanatan sanstha
Next Stories
1 मुंढेंविरोधात सर्वपक्षीय युतीसाठी भाजपचाच पुढाकार
2 वीज दरवाढीला कडाडून विरोध
3 जिल्ह्य़ात ‘बम बम भोले’चा गजर
Just Now!
X