मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जोरदार शक्तिप्रदर्शनाने दाखल झालेला उमेदवारी अर्ज, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांची बंडखोरी, उदयनराजे समर्थक राजेंद्र यादव यांना अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मिळालेली उमेदवारी यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील राजकीय वातावरण आज शनिवारी चांगलेच ढवळून निघाले. तर, राजेंद्र यादव यांना राष्ट्रवादीची मिळालेली उमेदवारी उंडाळकरांना फटका देणारी असल्याचे मानले जात असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सवाद्य भव्य मिरवणुकीत हजारो समर्थक कार्यकत्रे उत्स्फूर्त सहभागी झाले होते. तर, ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत झाल्याने त्यांच्या गटात समाधानाचे वातावरण होते. दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर भुर्के, काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज पाटील, कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, अ‍ॅड. प्रकाशराव चव्हाण यांची उपस्थिती होती. त्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी बंडाचे निशाण फडकवत अतिशय साध्या पध्दतीने आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव, पहिलवान शिवाजीराव जाधव यांची उपस्थिती होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही मिनिटातच कराडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्र सादर करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत सातारचे अ‍ॅड. दत्ता बनकर, राजकुमार पाटील यांची उपस्थिती होती. कराड दक्षिणेतून २५ उमेदवारांनी ३६ अर्ज दाखल केले आहेत. त्यात काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज पाटील यांचे बंधू डॉ. अजिंक्य ज्ञानदेव पाटील यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल करून, निवडणूक कार्यलायातच उपस्थित असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांचे आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे यावेळी सतेज पाटीलही उपस्थित होते. दिवसभरात मनसेतर्फे अ‍ॅड. विकास पवार, बसपातर्फे सतीश रणशिंगारे यांनीही पक्षाच्या अधिकृत पत्रासह उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, स्वाभिमान संघटनेचे शैलेंद्र शेवाळे, सेनेचे संजय मोहिते, रिपाइं आठवले गटाचे युवराज काटरे यांचेही  उमेदवारी अर्ज दाखल असून, हे अर्ज अपक्ष म्हणून नोंद असल्याचे सांगण्यात आले.