नवा वर्ग, नवे मित्र, नव्या बाई अशा उत्सुकतेने शाळेत पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांची शाळा सुरू झाली ती मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या मानव विकास निर्देशांकाच्या धडय़ाने! मुख्यमंत्र्यांनी या किचकट विषयावर केलेले भाषण आणि नेतेमंडळींकडून शिक्षण विभागाचे तोंडभरून झालेले कौतुक.. याद्वारे पुण्याच्या यशवंतराव चव्हाण शाळेत प्रवेशोत्सव ‘साजरा’ झाला खरा; पण त्यातून विद्यार्थ्यांना शाळेबद्दल ओढ वाटणार का, हा प्रश्न निर्माण झाला.
राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आनंद वाटावा, शाळेबद्दल ओढ वाटावी या उद्देशाने राज्यातील प्रत्येक शाळेने प्रवेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पुण्यातील शिक्षण मंडळाच्या यशवंतराव चव्हाण प्रशालेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हजेरी लावली होती.
शाळेच्या पहिल्या दिवशी खूप गंमत होणार, नवे मित्र मिळणार, मोठय़ा सुटीनंतर जुन्या मित्रांना भेटता येणार, नवी पुस्तके, खाऊ मिळणार अशा कल्पना रंगवत विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. प्रत्यक्षात मात्र पहिला दिवस वेगळा आहे, याची जाणीव शाळेत पाऊल टाकल्यावरच विद्यार्थ्यांना झाली. शाळेच्या मैदानावर उभा असलेला मांडव, फुग्यांची सजावट या सगळ्याची वाटणारी गंमत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना पाहून थोडय़ा वेळातच ओसरली. पहिल्यांदाच शाळेत जाणारी चिमुरडी, शाळेत जिकडे तिकडे पोलिस पाहून अधिकच बावरली. बहुतांश मुलं होती प्राथमिकची आणि काही सातवीपर्यंतची.
मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांनी एका वर्गात विद्यार्थ्यांना फुले देऊन त्यांचे स्वागत केले. मग सुरू झाला ‘प्रवेशोत्सवा’चा मुख्य कार्यक्रम! या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय मानव विकास निर्देशांकानुसार भारत खूप मागे आहे. आंतरराष्ट्रीय मानव विकास अहवालाप्रमाणेच राज्याचा मानव विकास अहवाल तयार करण्यात आला असून त्यामध्ये शिक्षण, विकास या सर्व गोष्टींमध्ये राज्याची जिल्हानिहाय स्थिती कळू शकते. या पुढील अर्थव्यवस्था ही ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था राहणार आहे, हे लक्षात घेऊन शिक्षणाच्या दर्जाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. त्यासाठी पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.’’
शाळेत राजकीय टोलवाटोलवी : समोरच्या स्टेजवर काहीतरी छान पाहायला, ऐकायला मिळेल अशा अपेक्षेने विद्यार्थी बसले होते. प्रत्यक्षात मात्र शिक्षण विभागाच्या कामगिरीचे गोडवे, ते सिद्ध करण्यासाठी मोठे मोठे आकडे, मोठे मोठे शब्द आणि कोण किती चांगले काम करतो या बद्दलची राजकीय टोलवाटोलवी असं सगळं कानावर पडू लागलं. ‘शाळेच्या पहिल्या दिवशी एवढं कठीण शिकवतात?..’ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या या प्रश्नासह शाळेचा ‘प्रवेशोत्सव’ साजरा झाला.