परभणी जिल्हा प्रशासनाचा निर्णय; औरंगाबाद व नांदेड  एसटी प्रवासी वाहतुकीवरही २३ मार्चपर्यंत निर्बंध

जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून दिवसेंदिवस  नवनव्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या खासगी बसेसची वाहतूक बंद करण्यात आली असून औरंगाबाद नांदेड येथे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीवरही २३ मार्चपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज सोमवारी (दि. १५)  सायंकाळी  काढले आहेत.

करोना या विषाणूचा जिल्ह्यात प्रादुर्भाव व संसर्ग होऊन करोना बाधित रुग्णसंख्येत वाढ  होत आहे.  मुंबई, पुणे औरंगाबाद, नांदेड इत्यादी जिल्ह्यामध्ये करोनाबाधित रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ  होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून येणाऱ्या करोना बाधित रुग्णांकडून संपर्कात आलेल्या व्यक्तीमार्फत करोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग जिल्ह्यात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या सर्व जिल्ह्यांतील प्रवासी वाहतुकीद्वारे परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपायोजना जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये  परभणी जिल्ह्यातून पुणे व मुंबईकडे जाणारी व येणारी सर्व खाजगी बस वाहतूक दिनांक उद्या (मंगळवार) ते २३ मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश काढले

आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे परभणी जिल्ह्यातून औरंगाबाद व नांदेड येथे जाणारी व येणारी प्रवासी वाहतूक १६ ते २३ मार्च पर्यंत बंद केली आहे. या प्रतिबंधातून पूर्वपरवानगीने आवश्यक सेवेस सूट देण्यात आली आहे.