एजाज हुसेन मुजावर

करोनाच्या संकटाविरुद्ध जगभर वैद्यकीय, पोलीस, प्रशासन आणि सामाजिक स्वयंसेवी संस्था अहोरात्र लढत आहेत. सोलापुरात करोनाविरुद्ध लढताना काही अपवाद वगळता बहुसंख्य डॉक्टर मंडळींनी पाठ फिरविली आहे. दुसऱ्या महायुद्धात सोलापूरचे थोर मानवतावादी सुपुत्र डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांना चीनमध्ये जखमी सैनिकांची अहोरात्र वैद्यकीय शुश्रूषा करताना मरण आले होते. त्यांचा उल्लेख आजही केला जातो. परंतु सध्याच्या करोना लढाईतून पळ काढणाऱ्या येथील बहुसंख्य डॉक्टरांकडे पाहताना डॉ. कोटणीस यांचा वारसा तो हाच म्हणायचा काय, असा सवाल आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य रुग्णांचे वैद्यकीय सेवेअभावी प्रचंड हाल होत आहेत. करोना संसर्गाच्या भीतीपोटी अनेक छोटे-मोठे दवाखाने, डॉक्टरांच्या ओपीडी, आयपीडी बंदच आहेत. बिगरकरोना रुग्णांना तर कोणी वालीच उरला नाही, अशी परिस्थिती आहे. प्रसूतिगृहे, बालरुग्णालयांसह इतर बहुसंख्य सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी रुग्णांना विनवण्या कराव्या लागत आहेत. एक्स-रे, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआरआयसारख्या निदान केंद्रांची सेवाही सहजपणे मिळत नाही. एरव्ही सोलापूरच्या वैद्यकीय सेवेचा आदराने उल्लेख केला जातो. शेजारच्या मराठवाडय़ासह कर्नाटकातील अनेक रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी सोलापूरला येणे पिढय़ान् पिढय़ा पसंत करतात. परंतु सध्याच्या करोना संकटात येथील वैद्यकीय सेवाच खंडित झाल्यामुळे या आदराच्या परंपरेला गालबोट लागले आहे.

एखादा रुग्णालयात रुग्ण गेलाच तर त्याला, तुम्ही कोठून आलात, करोना रुग्ण आढळून आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातून आला असाल तर सरळसरळ हुसकावून लावले जाते. करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवा करण्यासाठी शासनाने पीपीई किट, मुखपट्टय़ा व अन्य उपकरणे उपलब्ध केली नाहीत, अशी कारणे सांगितली जातात. परंतु ही कारणे समर्थनीय वाटत नाहीत. खरे तर अशी उपकरणे उपलब्ध होणे सहज शक्य आहे. किंवा यात अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढता येऊ शकतो.

प्रशासनाचे निर्देश : करोना संकटात वैद्यकीय सेवा न देणाऱ्या डॉक्टरांना त्यांचे दवाखाने, ओपीडी, आयपीडी बंद न ठेवता सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तसेच शासकीय रुग्णालयात विविध २२ तज्ज्ञ डॉक्टरांना सेवा देण्याचीही सूचना देण्यात आली होती. त्यापैकी काही मोजकेच डॉक्टर सेवा देण्यासाठी शासकीय रुग्णालयात येतात. बहुसंख्य डॉक्टर विविध कारणे सांगून आपली सेवा गोरगरीब रुग्णांना देण्यास टाळाटाळ करीत आहेत. काही डॉक्टरांनी स्वत:च्याच ‘आजारपणा’चे कारण पुढे केले आहे. या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांविरुद्ध सार्वत्रिक नाराजी वाढत असताना अखेर सोलापूर महापालिका प्रशासनाने करोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात वैद्यकीय सेवा देण्याचे कर्तव्य विसरून वैद्यकीय सेवा बंदच ठेवणाऱ्या २८ दवाखान्यांविरुद्ध कठोर कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा वारसा सोलापूरला मिळाला आहे. त्यांचे स्मारक त्याचेच द्योतक आहे. सध्याच्या करोनासारख्या महामारीत सोलापूरच्या डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू करून डॉ. कोटणीसांचा वारसा कृतिशील जपण्याची गरज आहे.

– रवींद्र मोकाशी, डॉ. कोटणीस स्मारक समिती

करोनाच्या संकटात सरसकट सर्वच दवाखाने बंद नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत आम्ही वैद्यकीय सेवा देत आहोत. महापालिकेने नोटिसा बजावल्या म्हणजे आम्ही काही गुन्हेगार नाही. कारवाईच्या नोटिशीला उत्तर देण्यासही आम्हाला वेळ नाही.

– डॉ. शिरीष कुमठेकर