चाचणी न करताच रुग्णांवर उपचार केल्याचा खासगी रुग्णालयांवर ठपका

पालघर : खासगी रुग्णालयांत संशयीत रुग्ण गेल्यानंतर त्याची करोना चाचणी करणे बंधनकारक असताना ती न करताच त्या रुग्णावर उपचार केले जात असून त्यात त्या रुग्णाचा मृत्यू होत असल्याचा संशय जिल्हा प्रशासनाला आहे. त्यामुळे प्रशासनाने खासगी रुग्णालयात झालेल्या मृत्यूंचे वैद्यकीय परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र प्रशासनाने संबंधित रुग्णालय प्रशासनाला दिले असून यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा  देण्यात आला आहे.

करोनाची लक्षणे असलेले रुग्ण खासगी रुग्णालयांत आल्यानंतर त्यांची आवश्यक चाचणी करणे बंधनकारक असते. त्याच्या अहवालानंतर उपचार सुरू करणे गरजेचे असते. परंतु तसे न करता काही खासगी रुग्णालयांत सरसकट उपचार करीत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

अशा रुग्णांना तात्पुरते बरे वाटल्यानंतर शरीरातील प्राणवायूची पातळी खालावते. त्यात रुग्ण गंभीर होऊन दगावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चाचणी न करता उपचार करणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना अशा मृत्यूस जबाबदार धरले जाईल, असा इशारा पत्रातून दिला आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, ताप, सर्दी, खोकला व इतर करोनाची लक्षणे असलेले रुग्ण खासगी रुग्णालयांत आल्यास त्यांना आरोग्य केंद्रांमधून प्रतिजन चाचणी करण्याचे सूचित करण्यात यावे. प्रतिजन चाचणीचे नकारात्मक अहवाल आल्यास त्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्यास सांगण्यात यावे. चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत अशा व्यक्तीने घरातील इतर व्यक्तीपासून दूर राहण्याबाबत स्पष्टपणे सूचना देण्यात यावी तसेच आजाराचा संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगण्यात यावे. चाचणी अहवालात आजाराचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्यास जवळच्या करोना काळजी केंद्रामध्ये दाखल करण्याची वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णाला सूचना द्यावी तसेच गृह विलगीकरणात राहत असणाऱ्या रुग्णांनी आपल्या शरीरातील प्राणवायूची पातळी नियमित तपासणी करावी. प्राणवायू पातळी खालावल्यास त्यांनी रुग्णालयात दाखल व्हावे असे नमूद करण्यात आले आहे.

‘लस घेण्यासाठी प्रोत्साहित करा’

उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णाने करोना लस घेतली आहे का? याची चौकशी करून अधिकाधिक नागरिकांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्याचे खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना प्रशासनाने पत्राद्वारे आवाहन केले आहे. लक्षणे असलेल्या व्यक्तींनी पहिल्याच दिवशी चाचणी केल्यास व त्यांच्यावर उपचार सुरू केल्यास नंतर प्राणवायूची किंवा रेमडेसिविरची गरज भासणार नाही, असे नमूद करून लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तातडीने करोना तपासणी करून घेण्यात यावी.