News Flash

करोना रुग्णांची आर्थिक लूट

खासगी रुग्णालयात वाढीव देयके, उपचाराचे दरपत्रक जाहीर करण्याची मागणी

खासगी रुग्णालयात वाढीव देयके, उपचाराचे दरपत्रक जाहीर करण्याची मागणी

पालघर : करोनाच्या दुसऱ्या लाटेत शासकीय आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याने खासगी रुग्णालयांवर प्रशासनाला अवलंबून राहावे लागत आहे. मात्र खासगी रुग्णालये कधी प्राणवायूचा तुटवडा, रेमडेसिविरचा तुटवडा व इतर उपचाराची कारणे सांगत करोना रुग्णांचा उपचाराचा खर्च वाढवत आहेत. वाढीव देयके आकारली जात आहेत. याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यात जिल्हा प्रशासनाने उपचाराचे दरपत्रक जाहीर न केल्याने रुग्णांची लूट सुरू आहे.

करोना उपचारासाठी पालघर जिल्ह्यात सुमारे ३७ खाजगी रुग्णालयांना उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यातील काही रुग्णालयांत रुग्णांची आर्थिक लूट सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शासनाने खासगी रुग्णालयांच्या दर आकारणी संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या असून त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयावर सोपवली आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील सर्वसाधारण खाटांसाठी चार हजार रुपये, तर प्राणवायू खाटांसाठी साधारणपणे आठ हजार रुपयांची आकारणी केली जात आहे. असे असताना बोईसर येथील एका खासगी रुग्णालयाने आठ-नऊ  दिवसांच्या उपचारासाठी दीड लाख रुपये देयक आकारणी केल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी निदर्शनास आणून दिले आहे. इतर काही रुग्णालयाने देखील दुपटीने दर आकारणी करत असल्याच्या तक्ररी पुढे येत आहेत.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णाला करोनाव्यतिरिक्त इतर सहव्याधी असल्याचे सांगून त्याच्यावर अतिरिक्त उपचार

करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. काही रुग्णालयांत दर दोन दिवसांनी सीटी स्कॅन करणे गरजेचे असल्याचे भासवून देयकाची वाढीव रक्कम आकारली जात आहे. तर काही ठिकाणी रेमडेसिविर प्रत्यक्षात न देता देयक आकारणी केली जात आहे. रुग्णालये प्राणवायू तिप्पट दराने विकत घेत असल्याने प्राणवायू खाटांचे दर वाढविण्यात आल्याचे  रुग्णालय व्यवस्थापनांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना सांगण्यात येत आहे.

वाढीव देयक भरण्यास विरोध केल्यानंतर काही प्रमाणात देयक कमी करून दिल्याचे प्रकार पुढे आले आहेत. नातेवाईकांकडून वाढीव देयकासंदर्भात विचारणा केल्यानंतर रुग्णांना इतरत्र हलवण्याची गरज असल्याचे सांगून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रकारही सुरू आहेत. रुग्णाचे प्राण वाचवण्याचे प्राधान्य असल्याने नातेवाईक अनेकदा मेटाकुटीला येऊन देयकाची रक्कम भरत आहेत.

पालघर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात जेमतेम दोनशे रुग्णांवर करोना उपचार केंद्रांमध्ये उपचार करण्याची क्षमता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागली असल्याने अशा बाबींकडे जिल्हा प्रशासन सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत असल्याचे आरोप रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.

दरपत्रक जाहीर करण्याची मागणी

जिल्हा व आरोग्य प्रशासनाने खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी दरपत्रक जनहितार्थ जाहीर करणे अपेक्षित असताना ते करण्यात आले  नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांचे फावते झाले आहे. उपचारासाठीचे दरपत्रक जाहीर करावे तसेच रुग्णालयांनी आपले दर ठळकपणे प्रसिद्ध करावे, अशी मागणी होत आहे.

देयका संदर्भात तक्रारी असल्यास आपल्या कार्यालयात लिखित स्वरूपात तक्रार करण्यात यावी. तसेच याप्रकरणी दोषी आढळल्यास किंवा शासकीय नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. 

डॉ. राजेंद्र केळकर, जिल्हा शल्यचिकित्सक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 12:54 am

Web Title: private hospitals in palghar are overcharging for coronavirus zws 70
Next Stories
1 क्षयरोगाने त्रस्त रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न
2 अत्यवस्थ रुग्णांची तडफड
3 मिरजेजवळ ऐतिहासिक विहिरीमध्ये पेशवेकालीन शिलालेख
Just Now!
X