काँग्रेसमध्ये प्रियंका गांधी यांची महासचिवपदी नियुक्ती केल्यानंतर भाजपाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर टीका केली असतानाच शिवसेनेने मात्र प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रियंका गांधी यांनी पक्षात सक्रीय व्हावे, अशी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी होती. अखेर त्या राजकारणात आल्या आहेत. राजकारणातील कारकिर्दीसाठी आम्ही प्रियंका गांधी यांना शुभेच्छा देतो’, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

बुधवारी काँग्रेसने प्रियंका गांधी यांची महासचिवपदी नियुक्ती केली असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेश पूर्वची (पूर्वांचल) जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियंका गांधी या सक्रीय राजकारणात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर भाजपाने राहुल गांधी यांचे नेतृत्व अपयशी ठरल्याचे सांगितले. दुसरीकडे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रियंका गांधी यांच्या प्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली. रिपब्लिक वृत्तवाहिनीला त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रियंका गांधी यांचा सक्रीय राजकारणातील प्रवेश हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. राजकारणात प्रवेश करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे’, असे त्यांनी सांगितले.

‘काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनाही प्रियंका गांधी यांनी सक्रीय राजकारणात यावे, असे वाटत होते. आता त्या राजकारणात आल्या आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि राजकीय कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा देखील देतो. काँग्रेस नेतृत्वाने प्रियंका गांधी यांना सक्रीय राजकारणात का आणले आणि आता पुढे काय होईल हे आम्हाला माहित नाही, असेही त्यांनी नमूद केले.