पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी भारताचा स्टार कबड्डीपटू रोहित चिल्लरला दिल्ली पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे. हुंड्यासाठी पती, सासू, सासरे यांच्याकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे रोहितची पत्नी ललिताने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेल्या ऑडिओ क्लिप व सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. तीनच दिवसांपूर्वी ललिताने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रोहितचे वडील विजय यांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.
रोहित आणि ललिताचा सुमारे सात महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. चार वर्षांच्या मैत्रीनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. लग्न झाल्यापासून रोहित व त्याचे आई-वडील आपल्याला पैशांसाठी मारहाण करायचे असे तिने ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले होते. ललिताने दिल्लीतील नांगलोई परिसरातील आपल्या वडिलांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली हाती.
दरम्यान रोहितने याप्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. फेसबुक पोस्टवर त्याने स्वत:चा एक व्हिडिओ टाकला असून माझे ललितावर मनापासून प्रेम होते. मी तिला कधीच त्रास दिला नसून मी निर्दोष असल्याचे त्याने म्हटले आहे.
रोहित कुमार राष्ट्रीय स्तरावर अनेक वर्षे कबड्डी खेळत असला तरी प्रो-कबड्डी स्पर्धेमुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात रोहित कुमार पाटणा पायरेट्स संघाकडून खेळला होता. वैशिष्ट्यपूर्ण चढायांच्या जोरावर तो अल्पावधीतच कबड्डी रसिकांमध्ये लोकप्रिय झाला होता. रोहित कुमार मूळचा हरियाणाचा असून २००९ साली स्पोर्टस कोट्यातून त्याला नौदलात नोकरी मिळाली होती.