मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबविषयी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेले विधान दुर्दैवी असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून अॅड. निकम यांच्याकडून खुलासा मागवावा लागेल, असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. सरकारचे समाधान न झाल्यास निकम यांच्यावर कारवाई करता येऊ शकेल, परंतु तथ्य जनतेसमोर ठेवण्यास त्यांना सांगणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.
अजमल कसाबने कधीच बिर्याणी मागितली नव्हती. तर, त्याच्याबद्दल निर्माण होऊ लागलेल्या सहानुभूतीच्या वातावरणाचे रूपांतर संतापात व्हावे, यासाठी तशी अफवा पसरविण्यात आली असावी, असे वक्तव्य अॅड. निकम यांनी जयपूर येथे केले होते. यासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना खडसे यांनी निकम यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा डागाळण्याची भीती व्यक्त केली.