आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघा पक्षांनी समंजसपणे वागण्याची गरज असून दोघांनी एकमेकांविरुद्ध टक्कर दिल्यास दोन्ही पक्ष अडचणीत येतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. परस्पर सामंजस्याने जागा वाटप न झाल्यास राष्ट्रवादीला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सोमवारी सोलापूर दौ-यावर आल्यानंतर अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळसदृश टंचाईस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासह इतर विविध मुद्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नेतृत्वातून लढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला. माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी काल बार्शी येथे जाहीर सभेत बोलताना अल्पसंख्याक समाजाविषयी विशिष्ट शब्द वापरून भडक वक्तव्य केल्याबद्दल लक्ष वेधले असता, पवार म्हणाले. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी कोणत्याही समाजाला विशिष्ट शब्दांनी हिणवणे योग्य नाही. कायद्याच्या चाकोरीबाहेर जाऊन भडक भाषा वापरली गेली असेल, तर त्याबाबतचा अहवाल मागवून रामदास कदम यांच्यावर गृहखाते कारवाई करील. मात्र अशा प्रकारची भडक भाषा वापरून जाताी-धर्माचे राजकारण करीत मतदारांची सहानुभूती मिळवायची, असा हा केविलवाणा प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्याविकास प्रतिष्ठानने बारामतीत शासकीय भूखंड घेतल्याच्या मुद्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले, एकतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आयुष्यात एकही संस्था उभी केली नाही. संस्था ही काही वा-यावर चालत नाही. त्यासाठी जमीन ही लागतेच. बारामतीत विद्या प्रतिष्ठानने घेतलेला शासकीय भूखंड शासनाच्या नियमानुसारच घेतला असून त्यात बेकायदा अशी कोणतीही बाब नाही. विद्या विकास प्रतिष्ठानमार्फत आम्ही केलेला विकास बारामतीत येऊन पाहा, असे आमंत्रण त्यांनी दिले. इंदापुरातही संस्थेने विकासाची कामे हाती घेताना ६५ एकर जागा बाजार भावाने खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला.
सध्या पावसाळ्यात पावसाची अपेक्षित साथ नसल्यामुळे टंचाईचे संकट उभे आहे. मात्र या प्रश्नावर शासन सामान्य शेतकरी व जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राज्यात काही भागात खरीप हंगामात झालेल्या पेरण्यांमध्ये सोयाबीनचे बियाणे निकृष्ट असल्याच्या तक्रारी आढळून आल्या असून या प्रकरणी कृषी खात्याने चौकशी करावी आणि संबंधित बियाणे उत्पादक कंपन्या दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेशही पवार यांनी दिले.