कोल्हापूरच्या टोल प्रश्नी विधानसभेत राजदंड हिसकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निलंबित करण्यात आलेले राजेश क्षीरसागर व डॉ. सुजित मिणचेकर या दोन शिवसेनेच्या आमदारांचे शुक्रवारी करवीरनगरीत शिवसनिक व महायुतीच्यावतीने जल्लोषी स्वागत केले.
आमदारद्वयांची शहराच्या प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढून त्यांनी टोल प्रश्नी दिलेल्या लढय़ाचा सन्मान करण्यात आला. या वेळी पत्रकारांशी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी, शहरात गेल्या चार वर्षांपासून आयआरबीच्या जाचक टोल विरोधात आंदोलन सुरु आहे. सर्वसामान्य कोल्हापूरकरांना वेठीस धरणारा हा टोल आम्ही कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. शासनाला टोल रद्द कारण्यास भाग पाडू, त्याकरिता आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असे स्पष्ट केले. तर मिणचेकर यांनी आघाडी सरकारच्या जबाबदार आमदारांनी टोल व्यवहारात २० कोटी रुपयांचा ठपला पाडल्याचे वक्तव्य केले होते. त्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, भाजपचे महेश जाधव, धर्माजी सायनेकर, उत्तम कांबळे, दुग्रेश िलग्रस, बंडा साळोखे आदी उपस्थित होते.
विधानसभेतील निलंबनाच्या घटनेचे विवेचन करताना क्षीरसागर म्हणाले, ९ जून रोजी कोल्हापूर शहरातून टोल विरोधी कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जनतेच्या टोल विरोधी भावना शासनापर्यंत पोहचवून शासनाला या मोर्चाबाबत माहिती देण्याकरिता आणि टोल रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी स्थगन प्रस्ताव दाखल केला. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांनी या विषयी बोलण्यास संधी दिली नाही. यानंतर पुन्हा पॉईंट ऑफ इन्फॉरमेशनद्वारे टोल विषयी निर्णय देण्याची मागणी केली. परंतु यावेळीही विधानसभा उपाध्यक्षांनी या प्रश्नी बोलण्याचे टाळले, कोल्हापुरातील टोल प्रश्नाचे गांभीर्य राज्यकर्त्यांना कळावे, जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात याकरिता आम्ही राजदंड उचलला आणि शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले. यानंतर सभागृह तहकूब करत विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी माझे व डॉ.सुजित मिणचेकर यांचे अधिवेशन कार्यकाल संपेपर्यंत निलंबन केले. निलंबन करताना विधानसभा उपाध्यक्षांनी या क्रांतिवीरांना बाहेर घ्यावे असे संबोधले. त्यामुळे या क्रांतिवीरांकडून केलेल्या आंदोलनामुळे ४४ टोल नाके बंद केले. हाच या आंदोलनातील यशाचा पहिला टप्पा आहे. शासन मात्र करवीरच्या या प्रश्नावर सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे १० आमदार कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातून निवडून दयावेत. युतीची सत्ता आल्यास निश्चितच महाराष्ट्र टोल आणि एल.बी.टी मुक्त करू, असे आश्वासन त्यांनी दिले.