रवींद्र केसकर

लाडक्या भाऊरायाला रक्षाबंधनादिवशी बांधलेल्या राखीतील बीज नंतर जमिनीत अंकुरले तर त्यासारखी नवनिर्मित आणि पर्यावरणासाठी पूरक अशी ‘ओवाळणी’ बहिणीसाठी अन्य कुठली असणार? नेमका हाच संदेश समोर ठेवून उस्मानाबादमधील स्वआधार बालकाश्रमातील गतिमंद अनाथ मुलींच्या हातातून आकर्षक पर्यावरणपूरक राख्यांची निर्मिती झाली आहे.

दरवर्षी स्वआधार बालकाश्रमातील अनाथ गतिमंद मुली आकर्षक राख्या तयार करतात. यंदा त्यांनी करंज, बेल, पळस, कडूिलब, खैर, कडीपत्ता, शेवगा, अशा अनेक बहुपयोगी वेगवेगळ्या वृक्षांच्या बिया एकत्रितपणे ‘बीजराखी’ तयार केली आहे. प्रत्येक राखीत एक मोठे बीज ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर  त्याच्या अवतीभोवती फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे इतर लहान बिया आकर्षकपणे जोडून एका धाग्यात गुंफले आहे.

विशेष म्हणजे या राख्या तयार करताना कोणत्याही प्रकारचा रासायनिक रंग या बीजांवर लावण्यात आलेला नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी हातात बांधून झाल्यानंतर हे बीज जमिनीत लावावे, त्यातून उगवणाऱ्या झाडांची देखभाल भावांनी करावी, अशी संकल्पना या  भगिनींनी मोठय़ा कल्पकतेने मांडली  आहे.

विविध रंगांची पाने, फुले आणि चवदार फळे आपल्याला निसर्गाच्या कुशीतून मिळतात. आवश्यक असलेला ऑक्सिजन देखील निसर्गाचीच  देणगी आहे. म्हणूनच पर्यावरणपूरक जीवन जगण्यासाठी आणि पर्यावरणाचे संवर्धन गरजेचे आहे. त्याची जाणीव रुजविण्यासाठी अत्यंत जबाबदारीने या मुलींनी हा छोटासा मात्र सकारात्मक प्रयत्न केला आहे. या आकर्षक राख्या नव्या झाडांना जन्म देतील आणि त्यातून हजारो बिया पुन्हा जन्म घेतील आणि पर्यावरणाची मजबूत साखळी निर्माण होण्यास सहकार्य होईल. या भावनेतून या बीजराख्यांची निर्मिती करण्यात आली, असे बालकाश्रमाचे संचालक शहाजी चव्हाण यांनी सांगितले.

गतिमंद मुलींनी समाजासमोर ठेवलेला हा पर्यावरणपूरक संदेश प्रेरणादायी असाच आहे. स्वआधारमधील या अनाथ मुलींनी तयार केलेल्या राख्या भेट स्वरूपात आपली वाट पाहत आहे. त्याचा स्वीकार करून पर्यावरणपूरक रक्षाबंधनासाठी स्वतला निरगाठ बांधा आणि या सुंदर बियांच्या राख्यांचा उपयोग संपल्यानंतर त्या मातीच्या कुशीत टाकून वनराई निर्मितीसाठी भाऊरायाचे योगदान लाभावे, असा उद्देश आम्ही ठेवला.

– शहाजी चव्हाण, संचालक, स्वआधार बालकाश्रम