कविता हे अभिव्यक्तीचे समर्थ माध्यम आहे. त्यामुळे एकूणच साहित्यात इतर प्रकारापेक्षा कवितेला जास्त प्राधान्य दिले जाते. यातूनच कवितांची निर्मिती आज वाढली आहे. परंतु कवितेतील गुणवत्ता मात्र घटली आहे, असा सूर  ‘आजचे भरमसाठ कवितालेखन : बाळसं की सूज’ विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आला.

या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे तर सहभागी वक्ते म्हणून डॉ. कैलास अंभुरे, डॉ. समिता जाधव, डॉ. श्रीकांत पाटील, कवी अरुण म्हात्रे, सीमा शेटे- रोटे उपस्थित होते.

यावेळी अरुण म्हात्रे म्हणाले, कविता निर्माण होऊ  द्यावी, ती कविताच आहे वा नाही, हा निर्णय रसिकांना घेऊ  द्यावा. कवी सुरेश भट यांच्यानंतर आता खूप कवी गझल लिहितात पण त्याला बाळसे म्हणण्याची हिंमत होत नाही. साधारण कुठल्याही कवीच्या एकूण कवितांपैकी १५ टक्केच कविता रसिकांना भावणाऱ्या असतात. कवितेची एखादी ओळ लक्षात राहिली तरी त्या कवितेचे चीज होते. चारोळ्या नावाच्या नव्या प्रकारामुळे युवा वर्ग जुळला असला तरी मोठय़ा कवितेपासून आपण लांब जात आहोत. मुळात कवितेची समीक्षा होणेही आज काळाची गरज असल्याचे मत कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले.

डॉ. कैलास अंभोरे म्हणाले, मुळात इसविसनपूर्व काळातही मोठय़ा प्रमाणात कविता केल्या जात होत्या आणि प्रत्येकच काळात कवितांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात झाली आहे. पण केवळ शब्दांची जुळवाजुळव करून कविता मात्र होत नाही. सध्या कवितेची गुणवत्ता ढासळली आहे. पण मोठय़ा प्रमाणात कवितांची निर्मिती होत असल्याने त्यामुळे कुणाचे फार मोठे नुकसान झालेले नाही. समाजमाध्यमांच्या विस्फोटामुळे आपल्याला कवितांची निर्मिती जाणवत असली तरी ही निर्मिती अशीच प्रत्येक काळात झाली आहे. समाजमाध्यमांमुळे ही निर्मिती आता आपल्यावर येऊ न आदळते, हाच फक्त फरक आहे. धोका फक्त एकच की, ही कविता सेन्सॉर होऊ न येत नाही, तशी काही व्यवस्थाही नाही. पण आजच्या कवितेने नवे शब्द, नव्या संकल्पनांना जन्म दिला आहे. महिलांचे लिंगभान आणि समाजभान त्यातून दिसते आहे. नवकवींनी कविता लिहिण्याची, प्रसिद्ध करण्याची घाई न करता कवितेला फुलासारखे हळुवार फुलू द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सीमा शेटे-रोटे म्हणाल्या, कविता लेखनाला सध्या प्रचंड सूज आली आहे. हे अनारोग्याचे लक्षण आहे. ही सूज छाटायलाच हवी. बाळसे टवटवीत असते. पण वैचारिक बाजूने समीक्षा केली तर कवितांच्या भरमसाठ निर्मितीने कवितेची परंपरा समृद्धच केली आहे. कविता पूर्वी संपादकीय चाळणीतून तपासली जायची आणि त्यानंतर प्रसिद्ध केली जायची. सध्या समाजमाध्यमावर कविता प्रसिद्ध होत असल्याने कविता न वाचताच त्यावर लाईक्स यायला लागले आणि कवी स्वनामधन्य होऊ  लागले आहेत. त्यात कविताच सापडत नाही, अशा कवींचा भरणा अधिक आहे. काळाच्या कसोटीवर टिकेल तीच खरी कविता. पण समाजमाध्यमांनी हे गांभीर्य हरवले आहे आणि लाईक्स मिळाले की एखादा कवी म्हणून मिरवतो आहे. पण याही स्थितीत चांगली आणि अस्सल कविता समोर येतेच. कवितालेखनामुळे अनेक लोक भाषेशी जुळत आहेत पण त्यातली खरी कविता कोणती? हे रसिकांनी जबाबदारीने पाहणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. समिता जाधव यांनीही आपले विचार मांडले. अध्यक्षीय भाषण डॉक्टर अक्षय कुमार काळे यांनी केले.