‘नॅक’ समितीच्या भेटीच्या निमित्ताने येथील पीपल्स कॉलेजमध्ये निर्माण करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात प्रशिक्षित डॉक्टरऐवजी मराठी विषयाच्या एका प्राध्यापकाला डॉक्टरच्या भूमिकेत बसविण्यात आल्याची चमत्कारिक माहिती समोर आली आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळातील काही सदस्यांनी या माहितीला दुजोराही दिला.

स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेले पीपल्स कॉलेज स्थापनेच्या सत्तराव्या वर्षांकडे वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर यूजीसीने अनिवार्य केलेले मूल्यांकन करून घेण्यासाठी या महाविद्यालयाने ‘नॅक’ च्या समितीला पाचारण केले होते. तत्पूर्वी या महाविद्यालयाने नव्या पद्धतीनुसार आपला शैक्षणिक लेखाजोखा ऑनलाइन पाठविला होता, त्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती गेल्या आठवडय़ात येथे आली होती. पाच वर्षांपूर्वीच्या मूल्यांकनात ‘पीपल्स’ला ‘अ’ दर्जा मिळाला होता. आता येऊन गेलेल्या समितीकडून कोणता दर्जा मिळतो, याची महाविद्यालय प्रशासन प्रतीक्षा करत असतानाच वरील समितीच्या भेटीतील काही बाबी समोर आल्या आहेत.

‘पीपल्स’मध्ये कला व वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतच्या तसेच या दोन्ही शाखांमध्ये काही विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमांची व्यवस्था असून येथील मराठी भाषा विभागाला राम शेवाळकर, डॉ. स. रा.गाडगीळ, नरहर कुरुंदकर, दत्ता भगत, श्रीनिवास पांडे अशा प्रज्ञावंतांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. नॅक समितीने दोन दिवसांत महाविद्यालयातील अन्य विभागांना भेट दिली; पण कुरुंदकरांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेल्या मराठी विभागात समितीच्या एकाही सदस्याने पाऊल टाकले नाही. समाजशास्त्र, इतिहास या नामांकित विभागाकडेही समितीने पाठ फिरवली, असे सांगण्यात आले.  ही समिती येथून गेल्यानंतर काही सुरस बाबी बाहेर येत आहेत. महाविद्यालयातील प्रमिलाताई भालेराव आरोग्य केंद्रात प्रशिक्षित डॉक्टरांची व्यवस्था करण्याऐवजी मराठी विषयाच्या एका प्राध्यापकालाच तेथे बसविण्यात आले. सूट परिधान केलेल्या या प्राध्यापकाने गळ्यात स्टेथस्कोप अडकवून ही तात्पुरती भूमिका खुबीने पार पाडण्याचा प्रयत्न केला. समितीचे प्रमुखच या केंद्रात गेले. त्यांनी तेथे आपला रक्तदाब तपासून घेतला; पण नंतरच्या उलट तपासणीतून या डॉक्टरांना आपण मराठीचे प्राध्यापक असल्याची कबुली द्यावी लागल्याचे सांगण्यात आले. या अनिष्ट प्रकारामुळे समितीप्रमुख संतप्त झाले होते. मराठीच्या प्राध्यापकासोबत कम्पाउंडरची भूमिका कनिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्राच्या एका प्राध्यापकाने केली.

‘नॅक’ मूल्यांकन प्रक्रियेत अलीकडे व्यापक बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर नांदेडमधील पहिले महाविद्यालय, अशी ओळख सांगणाऱ्या ‘पीपल्स’चे मूल्यांकन झाले.

शैक्षणिक बाबींशिवाय इतर कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत, यालाही काही गुण असल्याने पीपल्समध्ये आरोग्य केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग इत्यादी बाबी दाखविण्यात आल्या. वाणिज्य शाखेच्या एका प्राध्यापकाला आपल्या पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय समितीला सांगता आला नाही. अधिक माहितीसाठी प्राचार्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क होऊ शकला नाही.

आमच्या महाविद्यालयात ‘नॅक’ समिती येणार याची आपल्याला कल्पना होती. समितीच्या भेटीदरम्यान  महाविद्यालयात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित नसल्याने आम्ही कोणीही तेथे नव्हतो. पण  प्रमिलाताई आरोग्य केंद्रात डॉक्टरऐवजी मराठीच्या प्राध्यापकाला नियुक्त करण्यात आले होते का, याची माहिती प्राचार्याकडून घ्यावी लागेल.

– चतन्यबापू देशमुख, उपाध्यक्ष, नां.ए.सो.