जालना : जिल्ह्यातील बदनापूर निर्मल क्रीडा समाजप्रबोधन ट्रस्टच्या महाविद्यालयाने प्राध्यापकांना मिळणाऱ्या पगाराचा फलक लावला आहे. या फलकाची चर्चा शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही आहे. अशा प्रकारे पगाराचा फलक लावणे अनुचित असल्याची प्रतिक्रिया प्राध्यापकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र या प्रयोगाचे स्वागत केले आहे.

सरकार शिक्षणासाठी प्राध्यापकांच्या वेतनावर किती खर्च करते याची जाणीव विद्यार्थी आणि पालकांना व्हावी या उद्देशाने हा प्रयोग केल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. प्राध्यापकांच्या वेतनावर होणारा खर्च खूप अधिक असला तरी त्याचा  शिक्षण आणि समाजावर काय परिणाम होतो, असा सवाल नेहमीच केला जातो. त्या चर्चेला या नव्या फलकामुळे पाठिंबा मिळू लागला आहे. अनेक प्राध्यापक वर्गात शिकवतच नाहीत, असा आरोप केला जात होता.  मात्र, ‘बामुक्टा’ या प्राध्यापकांच्या संघटनेचे संदीप पाटील यांनी या प्रकारावर टीका करून हा प्रकार अनुचित असल्याचे म्हटले आहे.  एखाद्या महाविद्यालयात नावाला प्रवेश घेत अनेक विद्यार्थी वर्गात शिकण्यासाठी येतच नाहीत. त्यामुळे दररोज महाविद्यालयात येणारे प्राध्यापक शिकवत नाहीत, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे वेतनाचा फलक लावणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. एखादा कोणी कामचुकार असेल तर त्याच्यासाठी सर्वाचे वेतन जाहीर करणे चुकीचे आहे, असेही सांगण्यात येत आहे.

या फलकावर सर्वाधिक पगाराचा आकडा एक लाख ७८ हजार ६८० रुपये एवढा आहे. प्राध्यापकांचा पगार ही वैयक्तिक बाब असली तरी त्यांना दिला जाणारा पैसा हा जनतेच्या करातून दिला जातो. त्यामुळे एवढय़ा मोबदल्यात ते काय काम करतात, हे जाणून घेणे जनतेचा अधिकार असल्याचेही मत नोंदविण्यात येत आहे. अन्य शासकीस व निमशासकीय संस्थांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळणाऱ्या वेतनाचे आकडे जाहीर करायला हवेत, अशी मागणीही आता होऊ लागली आहे. बदनापूरच्या महाविद्यालयाने काही चुकीचे केले नसून ते इतर संस्था आणि कार्यालयांनाही अनुकरणीय असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे यांनी व्यक्त केले.