सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी डंपर व्यावसायिक आंदोलनात फूट पडून आरोप-प्रत्यारोप झाल्याने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेल्या निर्णयाने काँग्रेस पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी २१ मार्च रोजी काँग्रेसचा भव्य मोर्चा जाहीर केला असतानाच येत्या २२ मार्चपर्यंत मनाई आदेश जाहीर करून काँग्रेसची कोंडी केली आहे.
सिंधुदुर्गात ८ ते २२ मार्च या कालावधीसाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) आणि (३) प्रमाणे मनाई आदेश जारी केला आहे. शस्त्रास्त्र किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई आहे. याशिवाय आक्षेपार्ह घोषणा, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, आवेशपूर्ण भाषण अगर हावभाव करणे तसेच पाच अगर पाचपेक्षा जादा लोकांनी एकत्र जमा होणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे आदीला मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र आहे, असे या आदेशात म्हटले आहे.
सिंधुदुर्गनगरीत डंपर व्यावसायिक मालकांचे आंदोलन सुरू आहे. सिंधुदुर्गनगरीत डंपर मोठय़ा प्रमाणात उभे करून ठेवण्यात आले आहेत. तसेच आंदोलन अद्यापि मागे घेण्यात आले नसताना मनाई आदेश जारी करून काँग्रेसची जिल्हाधिकारी यांनी कोंडी केली आहे. शिमगोत्सव शांततेत पार पडावा म्हणून मनाई आदेश जारी केल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. डंपर व्यावसायिक आंदोलनामुळे काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्यासह ३८ जणांना न्यायालयात उद्या १० मार्चला हजर करण्यात येणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या गर्दीवरदेखील मनाई आदेश नियंत्रण ठेवणार आहे.
काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी प्रशासनाच्या विरोधात २१ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. पण हा मनाई आदेश २२ मार्चपर्यंत जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनाची प्रशासनाने कोंडी केली असल्याचे बोलले जात आहे.