चंद्रपुरमधील राजुरा तालुक्यातील सास्ती, भडांगपूर, कोलगांव, मानोली, धोपटाला, माथरा व अन्य गावातील जमीन ‘वेकोली’ने अधिग्रहित केल्यानंतरही अद्यापही येथील प्रकल्पग्रस्तांना नौकरी देण्यात आलेली नाही. याप्रकरणी तातडीने निर्णय करावा आणि नोकरी द्यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी सात वाजता वेकोलीच्या सास्ती टाउनशिप येथील टॉवरवर तीन प्रकल्पग्रस्त शेतकरी युवक चढले होते. तब्बल चार तासानंतर वेकोली प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलनकर्ते खाली उतरले.

वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रात धोपटाळा, सास्ती, मानोली, माथरा, कोलगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. यावर कोळशाचे उत्खनन सुरु झाले. परंतु, येथील स्थानिकांना अद्यापही नोकरी देण्यात आलेली नाही. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदनं दिली, चर्चा केली, यावर काहीही कार्यवाही न झाल्यामुळे अनेकदा आंदोलनं देखील करण्यात आली, परंतु तरी देखील काहीही मार्ग निघाला नाही. अखेर प्रकल्पग्रस्त शेतकरी विलास घटे, मारोती माऊलीकर, संजय बेले हे आज सकाळी सात वाजता सास्ती टाउनशिप येथील धोपटाळा पतसंस्थेच्यामागे असलेल्या टॉवरवर चढले. यानंतर शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी येथे गोळा झाले. वेकोली अधिकारी, पोलीस अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात चर्चा झाली. त्यानुसार वेकोली अधिकाऱ्यांनी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एक महिन्यात प्रक्रिया सुरु करून नोकरी देण्यात येईल,असे लिखित आश्वासन दिले. यानंतर हे तिघेही युवक टॉवर वरून खाली उतरले.

राजुरा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. यावेळी बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक सब्यसाची डे, महाप्रबंधक संचालन सी.पी.सिंह, वरिष्ठ अधिकारी वि.वि.परांजपे, सास्ती ओपनकास्ट कोळसा खाणीचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक जे.के. तिवारी, क्षेत्रीय कार्मिक व्यवस्थापक डी.के.तहाने, क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी.पुलय्या इत्यादी वेकोलीचे अधिकारी उपस्थित होते. राजुरा उपविभागीय पुलिस अधिकारी स्वप्निल जाधव, पुलिस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर यांनी चोख बंदोबस्त ठेऊन परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. तसेच, यावेळी प्रहार संघटनेचे सुरज ठाकरे, बंडू जुलमे, विजय चन्ने यांचेसह शेकडो प्रकल्पग्रस्त देखील उपस्थित होते.