News Flash

नाशिकच्या ‘प्रोजेक्ट बंधन’चा मेळघाटशी असाही ऋणानुबंध!

गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून मेळघाटशी हा अनोखा ऋणानुबंध जपला गेला आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी दोन लाखांच्या राख्या विकल्या

यंदा तब्बल दोन लाख रुपयांच्या बांबूपासून बनवलेल्या राख्या विकून नाशिकच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मेळघाटातील शंभरावर आदिवासी कारागिरांच्या जीवनाला हातभार लावला. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून मेळघाटशी हा अनोखा ऋणानुबंध जपला गेला आहे.

नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक समाज संचालित कर्मवीर बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमबीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. या विद्यार्थ्यांनी ‘प्रोजेक्ट बंधन’च्या माध्यमातून बांबूपासून बनवलेल्या राख्यांच्या विक्रीतून २ लाख २ हजार ४०२ रुपये इतकी रक्कम उभी केली. या रकमेचा धनादेश नुकताच संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार यांच्या हस्ते मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राच्या प्रमुख निरुपमा देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. एमबीए विभागाचे विद्यार्थी २०१३ पासून बांबूपासून बनवलेल्या राख्या विकण्याचे काम करीत आहेत. या निमित्ताने मेळघाटातील कारागिरांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी नाशिकमधील विविध भागात फिरून शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात या राख्या विकल्या. त्यातून त्यांनी २ लाख रुपये इतकी रक्कम उभी केली. या रकमेचा धनादेश वेणू शिल्पी औद्योगिक सहकारी या आदिवासींच्या संस्थेला देण्यात आला.

मेळघाटातील आदिवासींना आर्थिक मदत आणि त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दरवर्षी विद्यार्थी हा उपक्रम राबवतात, अशी माहिती संपूर्ण बांबू केंद्राचे प्रमुख सुनील देशपांडे यांनी दिली. बांबूपासून बनवलेल्या राख्यांना मागणी वाढत आहे. मुंबई, पुणे आणि मराठवाडय़ातही राख्या विकल्या गेल्या आहेत. यातून आदिवासींना रोजगाराचे साधन मिळाले आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही या राख्या पाठवण्यात आल्या. या माध्यमातून एमबीएच्या विद्यार्थ्यांनी विक्री कौशल्यासोबतच सामाजिक बांधिलकीही जपली, असे सुनील देशपांडे म्हणाले. वेणू शिल्पी औद्योगिक सहकारी संस्था ही आदिवासी कारागिरांसाठी काम करणारी संस्था आहे. बांबूपासून हस्तशिल्प आणि विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास आदिवासींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकेल, या हेतूने संस्थेतर्फे प्रयत्न केले जात आहेत. यातच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिलेली साथ मोलाची आहे, असे सुनील देशपांडे म्हणाले. नाशिक येथे संस्थेच्या वतीने निरुपमा देशपांडे यांना धनादेश प्रदान करण्यात आला. त्यावेळी प्रा.एस.के.शिंदे, प्रा.रामनाथ चौधरी, डॉ.आर.डी.दरेकर, डॉ.डी.टी. खरनार, डॉ.एस.आर.पाचोरकर, प्रा. नरेंद्र साळुंके, प्रा. लक्ष्मीकांत सोनटक्के, प्रा. स्वप्निल बच्छाव, प्रा.रूपाली महाले आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 1:52 am

Web Title: project bandhan campaign in melghat
Next Stories
1 अस्वल व तिच्या पिल्लांच्या संरक्षणामुळे आतेगावचा जन-वन योजनेत समावेश
2 स्थानिक मच्छी व्यावसायिकांवर गणेशोत्सवानंतर सेस
3 ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांविरुद्ध महाराष्ट्रातून सर्वाधिक तक्रारी
Just Now!
X