लोसकभा निवडणूक राष्ट्रवादाच्या मुद्यावर झाली. देशाच्या निवडणुकीत जनता राष्ट्रीय मुद्यावर एकत्र येतात. मात्र प्रादेशिक निवडणुका या स्थानिक मुद्यांवरच होतात. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता ढोंगी आणि खोटारडय़ा सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून आश्वासक बदल करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयेाजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, वक्ते अमोल मिटकरी उपस्थित होते.

अनेक नेत्यांच्या पक्षांतराबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात असून सध्या सुरू असलेली पक्षांतराची लाट ही क्षणिक आहे. भाजप, शिवसेनेत येणाऱ्यांपैकी २८८ जागांवर हे पक्ष किती जणांना तिकीट देतील, हा प्रश्नच आहे. त्यामुळे पक्षांतर करणाऱ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी पश्चाताप होईल, असे पवार म्हणाले.

सध्या पक्षांतर करणारे नेते स्वार्थी, संधीसाधू आहेत. सत्ताधाऱ्यांकडून चौकशी किंवा कारवाई होऊ  नये, या भीतीनेही अनेकांनी पक्षांतर केल्याची टीका त्यांनी केली.

सरकारने ७२ हजार पदभरतीचे गाजर दाखवून तरुणांना फसवले. हजारो उद्योग बंद पडले असून लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. राज्यात पोलीस, शिक्षकांची भरती बंद आहे. यवतमाळात एका मोठय़ा उद्योगसमूहाने तीनशे कामगारांना कमी केल्याची बातमी येथे आल्यावर समजली.

सत्ताधाऱ्यांची ही फसवणूक जनेतेच्या लक्षात आल्याने भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीला चांगले दिवस आहेत, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीने नव्या चेहऱ्यांना संधी देऊन डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी यांच्यासारख्या धडाडीच्या युवकांकडे जबाबदारी दिल्याचा सकारात्मक फरक राज्यात जाणवेल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी होणार असून मित्र पक्षांनाही सोबत घेऊ  असे ते म्हणाले. खासदार उदयनराजे भोसले, पुसदचे आमदार मनोहर नाईक यांच्या पक्षांतराबाबत काहीही माहिती नसून आजच्या घडीला हे नेते राष्ट्रवादीत आहेत, असे ते म्हणाले.

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया आदी उपस्थित होते.