News Flash

निवडणुकीचा धुरळा विसावला; छुप्या प्रचाराला सुरुवात

गेली महिनाभर उडालेला विधानसभा निवडणुकीचा धुरळा सोमवारी विसावला. सार्वजनिक प्रचाराची सांगता झाली असली तरी छुप्या प्रचाराला सुरुवात झाली असून हा अर्थपूर्ण प्रचार मतदानाला वेगळे वळण

| October 14, 2014 02:30 am

गेली महिनाभर उडालेला विधानसभा निवडणुकीचा धुरळा सोमवारी विसावला. सार्वजनिक प्रचाराची सांगता झाली असली तरी छुप्या प्रचाराला सुरुवात झाली असून हा अर्थपूर्ण प्रचार मतदानाला वेगळे वळण मिळवून देणारा ठरणार आहे. प्रचारच्या अखेरच्या दिवसाची संधी देत कडक उन्हातही सर्व पक्षीय उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी पदयात्रा, कोपरा सभा, जाहीर सभा, रॅली अशा विविध रूपाने प्रचार करीत मतदारांशी संपर्क साधला. दरम्यान, मतदानाला मंगळवारचा एकदिवस उरला असल्याने पोलीस प्रशासनाने संवेदनशील भागामध्ये संचलन केले. तर जिल्हा प्रशासनाची निवडणुकीची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या िरगणात उतरलेल्या उमेदवारांनी प्रचाराची राळ उडवून दिली होती. अहोरात्र प्रचार करूनही सर्वच भागात त्यांना पोहोचता आले नव्हते. त्यामुळे अखेरच्या दिवसाची संधी साधत त्यांनी शक्य तितक्या भागात प्रचाराचे नियोजन केले होते. उमेदवार, त्यांचे समर्थक, नातेवाईक यांनी वेगवेगळे विभाग, गावे वाटून घेऊन मतदारांशी संपर्क साधला. बहुतांशी सर्वच गावातील कार्यकर्त्यांनी आज मुख्यत्वे करून भव्य पदयात्रेवर जोर ठेवला होता. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत स्पर्धक उमेदवारांपेक्षा आपली ताकद अधिक असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. प्रचाराची सांगता करताना जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने पुन्हा एकदा उमेदवारांनी आपण केलेल्या कामांचा आढावा घेत मतदारसंघाच्या विकासासाठी विजयी करण्याचे आवाहन केले. याचवेळी विरोधकांचे वस्त्रहरण करीत त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशाराही दिला. यामुळे अखेरच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उडाल्या होत्या.
मतदानाला काही तासांचा अवधी उरला असताना जिल्हा व पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. निवडणूक विभागाने मतदानासाठी आवश्यक असणारे बॅलेट मशिन, स्टेशनरी व अन्य साहित्याची तजवीज केलेली आहे. संबंधित साहित्य मतदान केंद्र अधिकारी व सहकाऱ्यांकडे दिले जाणार असून ही मंडळी उद्या मंगळवारी मतदान केंद्रात पोहोचणार आहेत. यामुळे शाळा-महाविद्यालयांना मंगळवार व बुधवार असे दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील काही मतदारसंघ संवेदनशील आहेत. या मतदारसंघावर तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची बारीक नजर आहे. या भागात मतदानावेळी कसलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी संबंधित गावांमध्ये सशस्त्र संचलन केले. पोलीस प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर पाठविण्यात येणाऱ्या अधिकारी व पोलिसांची जबाबदारी निश्चित केली आहे. मतदानादिवशी अतताई कृत्य करणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.                                                                   सोलापुरात पदयात्रांद्वारे प्रचाराच्या तोफा थंडावल्या…
विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील अकरा मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढतीत गेल्या काही दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी शांत झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजप व शिवसेनेसह प्रमुख प्रमुख पक्षांच्या तुल्यबळ उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह पदयात्रांसह सभा, बैठका घेऊन मतदारांना शेवटपर्यंत आकृष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या प्रमुख लढतीतील उमेदवारांसह त्यांच्या तुलनेत कमी ताकदीच्या इतर उमेदवारांनीही विजयाचे दावे केले आहेत. ११ जागांसाठी १९७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून यात १० विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघात विलक्षण चुरस असल्यामुळे त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. ही जागा कायम राखण्यासाठी स्वत: सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावत मतदारसंघात तळ ठोकला आहे. त्यांच्या विरोधात त्यांचे कालपर्यंत घनिष्ठ सहकारी असलेले विष्णुपंत कोठे यांचे पुत्र महेश कोठे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून तर माकपचे नेते नरसय्या आडम मास्तर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. अल्पसंख्याकांची मते विभागू शकणाऱ्या एमआयएममुळे कमालीची चुरस वाढली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही चुरस पाहावयास मिळाली. सुशीलकुमार शिंदे यांनी कन्या प्रणिती शिंदे यांच्यासोबत संपूर्ण मतदारसंघात पदयात्रा काढून मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेलुगू समाजाला आकृष्ट करण्यासाठी प्रसिद्ध तेलुगू चित्रपट अभिनेते मोहन बाबू यांचे पुत्र अभिनेते मंचू विष्णू वर्धन  व अभिनेत्री मंचू लक्ष्मी यांनाही पदयात्रेत सहभागी करून घेण्यात आले. तर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे महेश कोठे यांनी हजारो शिवसैनिक व समर्थकांसह पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन घडविले. माकपचे नरसय्याआडम मास्तर यांनीही संपूर्ण मतदारसंघातून जंगी पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शनाद्वारे आपले आव्हान सिद्ध केले. पदयात्रांच्या मार्गावर ज्या त्या उमेदवारांचे समर्थक कार्यकर्ते व नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी स्वागत केले. अनेक ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. पदयात्रांमध्ये कार्यकर्ते घोषणा देत उत्साह वाढवीत होते. भाजपच्या प्रा.मोहिनी पत्की, एमआयएमचे तौफिक शेख यांनीही पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले.
सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपचे आमदार विजय देशमुख व त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह शिवसेनेचे उत्तमप्रकाश खंदारे यांच्या पदयात्रा मोठय़ा होत्या. राष्ट्रवादीचे महेश गादेकर यांनीही पदयात्रा काढली. अनेक ठिकाणी या पदयात्रांचे स्वागत करण्यात आले. तर सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे आमदार दिलीप माने, भाजपचे सुभाष देशमुख, सेनेचे गणेश वानकर, राष्ट्रवादीचे बाळासाहेब शेळके, अपक्ष सुरेश हसापुरे, रवी पाटील या प्रमुख उमेदवारांनी गावभेटीसह पदयात्रा काढल्या. ठिकठिकाणी पदयात्रांचे स्वागत करताना कार्यकर्ते व ग्रामीण भागातील समर्थकांमध्ये उत्साह दिसून आला.
माळशिरस राखीव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार हणमंत डोळस यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज व परिसरात जंगी पदयात्रा काढली. तर शिवसेनेचे लक्ष्मण सरवदे यांच्यासाठी माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र धवलसिंह मोहिते-पाटील यांनी शक्ती पणाला लावल्याचे दिसून आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनेही पदयात्रा काढण्यात आली.
माढा येथे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी गावभेटीवर भर देताना पदयात्रांद्वारे शक्तिप्रदर्शन केले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे प्रा.शिवाजी सावंत, काँग्रेसचे कल्याणराव काळे, भाजप पुरस्कृत अपक्ष दादासाहेब साठे यांनी पदयात्रा काढून मतदारांशी शेवटपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर-मंगळवेढा येथे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत परिचारक, शिवसेनेचे समाधान अवताडे या तिरंगी लढतीत तिन्ही उमेदवारांनी पदयात्रा काढल्या. समाधान अवताडे यांनी मंगळवेढय़ात शक्तिप्रदर्शन केले. या ठिकाणी ‘लक्ष्मीदर्शन’ होत असल्याची कुजबूज ऐकायला मिळाल्याने तेथे निवडणूक प्रशासन यंत्रणेचेही लक्ष होते. अक्कलकोट, करमाळा, मोहोळ, बार्शी आदी ठिकाणीही पदयात्रा काढून प्रचाराची सांगता झाली.
रॅली, सभा, मिरवणुकांनी सांगलीत प्रचाराची सांगता
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम दिवशी रॅली, प्रचार सभा आणि कार्यकर्त्यांंसह फटाक्यांची आताषबाजी करीत काढलेल्या मिरवणुकीमुळे सांगली-मिरजेसह सर्व शहरातील वातावरण ढवळून निघाले. जोरदार शक्तिप्रदर्शन करून गेले १५ दिवस तापलेले वातावरण कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. सांगलीमध्ये काँग्रेसचे मदन पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, भाजपाचे सुधीर गाडगीळ, अपक्ष दिगंबर जाधव आणि मिरजेत भाजपाचे सुरेश खाडेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने आज जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते.
काँग्रेसच्या मदन नाटील यांच्या प्रचारासाठी आज मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मदन पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला. महापालिकेतील काँग्रेसचे सदस्य या रॅलीत सहभागी झाले होते. काँग्रेसच्या रॅलीचा प्रारंभ मध्यवर्ती बसस्थानकापासून करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश पाटील यांनी कॉलेज कार्नर येथून पदयात्रा काढली. यामध्ये महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. सकाळी शहरातील गणेश मंदिरापासून प्रचारासाठी पदयात्रा सुरू करण्यात आली.
शिवसेनेच्या रॅलीचा प्रारंभ शिवाजी पुतळ्यापासून करण्यात आला. शहरातील खणभाग, स्टेशन रोड या मार्गावरून बालाजी चौकात आल्यानंतर जाहीर सभेत रूपांतर झाले. याठिकाणी युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचे जाहीर भाषण होऊन प्रचार सांगता करण्यात आली. भाजपाचे सुधीर गाडगीळ यांनीही शहराच्या मुख्य रस्त्यावरून प्रचारासाठी पदयात्रा काढली. स्टेशन चौकामध्ये भाजपाच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या उपस्थित उमेदवार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीचा विकास करण्यासाठी संधी द्यावी असे सांगितले.
मिरजेत सुरेश खाडे यांनी भाजपाला विजयी करावे यासाठी शहरातून पदयात्रा काढली. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांनी पदयात्रा काढल्या. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारासाठी पदयात्रा काढल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 2:30 am

Web Title: proneness stop
Next Stories
1 ‘रन फॉर व्होट’मध्ये शेकडो सांगलीकर धावले
2 कॉंग्रेस बंडखोराविरोधात मिरजेत गुन्हा; पावणेदोन लाख जप्त
3 सीमेवर हल्ले होत असताना, शेपूट घालून गप्प का?
Just Now!
X