26 January 2020

News Flash

मराठवाडा आणि नाशिक-नगर वाद टाळणे शक्य

जायकवाडीतील पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक

जायकवाडीतील पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक

अशोक तुपे, श्रीरामपूर

जायकवाडी धरणाच्या इतिहासात प्रथमच अवघ्या १५ दिवसांत ९० टक्के पाणीसाठा झाल्याचा विR म झाला आहे.  परंतु योग्य नियोजन न झाल्यास पुन्हा मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा पाणी संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. पाण्याचे काटेकोर नियोजन केले तर दोन वर्षे हा संघर्ष होणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जायकवाडी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा मृतपाणीसाठय़ाचा वापर करण्यात आला. त्याची एकूण पाणीसाठवण क्षमता १०२ टीएमसी आहे. त्यापैकी जिवंत पाणीसाठा ७६ टीएमसी असून मृत पाणीसाठा २६ टीएमसी आहे. यावर्षी धरणातील मृत पाणीसाठय़ातून सुमारे ८ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला. असे पहिल्यांदाच घडले. धरणात जूनपासून पाणी येण्यास सुरुवात होते. मात्र जुलै महिना निम्मा झाला तरी नवीन पाणी धरणात आले नव्हते. यंदा धरण भरले नाही तर नगर विरुद्ध नाशिक असा पाणी संघर्ष निर्माण होईल, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत होते. मात्र निसर्गाने सारेच चित्र बदलून टाकले. नगर व नाशिक जिल्ह्य़ातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होऊन केवळ १५ दिवसांतच पाणीसाठय़ात वाढ होऊन  सर्व विक्रम मोडीत निघाले. धरणात आतापर्यंत ७५ टीएमसीपेक्षा जास्त पाण्याची आवक झाली आहे. विशेष म्हणजे मराठवाडय़ात पाऊस नसताना केवळ नगर व नाशिकमध्ये आलेल्या पुरामुळे ही किमया घडली. २८ जुलैपासून जायकवाडीत नवीन पाण्याची आवक सुरू झाली. धरणाचा पाणीसाठा आज ९० टक्कय़ावर म्हणजे ९३.३० टीएमसीवर जाऊन पोहोचला. जिवंत पाणीसाठा ६७.२६ टीएमसी झाला आहे.

१९७३ मध्ये जायकवाडीचे मातीचे तर १९७६ मध्ये दगडी धरणाचे काम पूर्ण झाले. १९७४ पासून धरणात पाण्याची आवक सुरू झाली. मात्र खऱ्या अर्थाने १९७६ पासून पाणी अडविण्यास प्रारंभ झाला. धरण बांधल्यापासून आतापर्यंत १९७६, १९७७, १९७८, २००५, २००६ मध्ये धरण पूर्ण  भरले होते.  नदीपात्रात पाणी सोडावे लागले होते. मात्र अत्यंत कमी कालावधीत धरणात सुमारे ७५ टीएमसीपेक्षा जास्त पाणी येण्याची घटना पहिल्यांदाच घडली. धरणात पाण्याची आवक अजूनही सुरूच आहे.

जायकवाडी धरण ऑक्टोबरमध्ये भरते. अपवादात्मक परिस्थितीत ते सप्टेंबरमध्येही भरले आहे. मात्र ऑगस्टमध्ये धरण भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. धरण जलाशय परिचालन सुचीनुसार धरणातील पाणीसाठा  नियंत्रित केला जातो. १५ ऑगस्टला धरणात ९३ टक्के एवढा पाणीसाठा ठेवण्याचे सूचीत नमूद केले आहे. त्यामुळे आता स्वातंत्र्यदिनापासून जायकवाडीतून गोदावरीत पाणी सोडण्यास प्रारंभ केला जाईल.

जायकवाडीचा उजवा कालवा सुमारे पावणे दोनशे किलोमीटरचा तर डावा कालवा  दोनशे आठ किलोमीटरचा आहे. उजव्या कालव्यातून बीड जिल्ह्य़ात तर डाव्या कालव्यातून औरंगाबाद व परभणीला पाणी जाते. सध्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ८०० क्युसेक्स तर डाव्या कालव्यातून परळी औष्णिक ऊर्जा केंद्रासाठी ४०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. पैठणच्या जलविद्युत केंद्रासाठी १५९० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असून त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील नांदेडपर्यंतचे बारा बंधारे भरून घेतले जाणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत धरणात पाण्याची आवक सुरू राहणार असून त्याचा मोठा लाभ मराठवाडय़ाला होईल. मात्र धरणातील पाणीसाठय़ाचे योग्य नियोजन केले नाही तर पुन्हा संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे.

नगर व नाशिक जिल्ह्य़ातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेतला जातो. मात्र जायकवाडीतील फुगवटय़ाच्या पाण्याचे नियोजन हे जलसंपदाच्या नियंत्रणाबाहेर गेले आहे. स्थानिक लोकांकडून होणारा विरोध, राजकीय पाठबळ, प्रशासनाची वेळकाढू भूमिका यामुळे धरणाच्या पाण्याचे कार्यक्षम व काटेकोर नियंत्रण करता आलेले नाही. पाणी वापरात सूत्रबद्धता आणता आलेली नाही. आतापासून नियोजन केले तर दोन वर्षे कुठलीही अडचण येणार नाही.

-उत्तम निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

जायकवाडी धरणात अत्यंत कमी कालावधीत मोठय़ा प्रमाणात पाणी आले. पंधरा दिवसात ७५ टीएमसीपेक्षा जास्त पाणी जमा झाले. परिचालन सूचीनुसार १५ ऑगस्टला ९३ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर नदीत पाणी सोडण्यात येईल. मराठवाडय़ातील ११ टीएमसी क्षमतेचे माजलगाव धरण कोरडे आहे. त्यात कालव्यातून पाणी सोडले जात आहे. मराठवाडय़ात पाऊस नाही, पण जायकवाडीने दिलासा दिला आहे. पेयजल, औद्योगिक, शेतीचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.

-एस.एम.राठोड, उपअभियंता, जायकवाडी धरण

First Published on August 14, 2019 2:43 am

Web Title: proper planning required for jayakwadi dam water distribution zws 70
Next Stories
1 जायकवाडी धरण ९० टक्के भरले!
2 नागपूर पोलीस मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुमची करणार तपासणी
3 राष्ट्रवादीकडून ५० लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द; पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी केल्या शिफारसी
Just Now!
X