13 July 2020

News Flash

ढसाळांची कविता. चव्हाणांची ‘संपत्ती’!

शंकरराव चव्हाण यांनी प्रदीर्घ राजकीय जीवनात स्वच्छ प्रतिमा कसोशीने जपली. सत्तेतून संपत्ती-मालमत्तेच्या भानगडीत ते पडले नाहीत, असेही त्यांच्याबद्दल सांगितले जात असे, याचा उल्लेख करून पद्मश्री

| March 29, 2014 01:50 am

शंकरराव चव्हाण यांनी प्रदीर्घ राजकीय जीवनात स्वच्छ प्रतिमा कसोशीने जपली. सत्तेतून संपत्ती-मालमत्तेच्या भानगडीत ते पडले नाहीत, असेही त्यांच्याबद्दल सांगितले जात असे, याचा उल्लेख करून पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी अशोकसारखा मुलगा असताना शंकररावांना संपत्ती-मालमत्ता जमा करण्याची काय गरज, असा सवाल सुमारे २० वर्षांपूर्वी एका लेखात केला होता. आज शंकरराव हयात नाहीत, ढसाळही नाहीत; परंतु ढसाळांचे निदान किती अचूक होते ते निवडणुकीच्या निमित्ताने अशोक चव्हाण यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या मालमत्तेवरून (सुमारे ४० कोटी!) समोर आले आहे.
अशोक चव्हाण नव्वदच्या दशकात राजकीय मंचावर आले. त्याच काळात त्यांनी व्यवसायातही दमदार पाऊल टाकले. ते १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत उभे राहिले, त्यावेळी एका वार्तापत्राचा ‘अशोक चव्हाण खासदार का, एजन्सीदार’ हा मथळा गाजला होता. त्या पुढच्या २५ वर्षांत राजकारणात एकेक पायरी वर चढता-चढता चव्हाणांचा व्यावसायिक विस्तार खूप वाढला. शेती व व्यवसायातील मिळकतीतून ते नांदेड मतदारसंघातून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांतून सर्वात धनवान, सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
शंकरराव चव्हाण यांनी राजकारणात पदार्पण करण्यापूर्वी आपल्या वडील बंधूंचा ‘आदर्श’ समोर ठेवत कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. पन्नासच्या दशकात हैदराबादेत शिक्षण सुरू असताना ते विवाह बंधनात (१९४३) अडकले. त्यांचा त्या काळातला संसार शिकवणीच्या मिळकतीवर चालला होता. त्यांच्या सहचारिणीने त्या काळातील आठवणी शब्दबद्ध करून ठेवल्या आहेत. पुढे नांदेडला स्थायिक होण्यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेने काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात आलेले शंकरराव या नगरीचे पहिले नगराध्यक्ष झाले. पण त्या काळात ते सायकल वापरत. याच काळात सायकलचा दिवा लावला नाही म्हणून त्यांनी दंडही भरला आणि एका कंत्राटदाराकडून लाच देण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा त्याने परस्पर दिलेले पाकीट पोलिसांच्या हवाली करण्याची तत्परता शंकररावांनी दाखविली होती.
अशोक चव्हाण यांची कौटुंबिक व राजकीय पाश्र्वभूमी अशी आहे. शंकरराव पहिली निवडणूक १९५२ मध्ये लढले, तर अशोक चव्हाण ३५ वर्षांनी म्हणजे १९८७ मध्ये. त्यानंतर राजकारणात स्थिर होण्यासाठी अनेकांप्रमाणे अशोक चव्हाण यांनीही व्यावसायिक जाळे भक्कम केल्याचे त्यांनीच जाहीर केलेल्या तपशिलातून दिसते. १०० रुपयांच्या ‘बाँड पेपर’सोबत संपत्ती व मालत्तेचा तपशील जाहीर करण्यासाठी त्यांना तब्बल ३५ पाने लागली आहेत. चव्हाण यांनी आपली स्वत:ची, पत्नी अमिता यांची आणि हिंदू अविभक्त कुटुंबाची एकंदर मालमत्ता व संपत्तीही जाहीर केली. त्यानुसार चव्हाण कुटुंबाची एकत्रित मालमत्ता ३८ कोटी ८४ लाख ५८ हजार ९३९ रुपये इतकी आहे.
अशोक चव्हाण यांनी व्यवसाय म्हणून शेतीसोबत भारत पेट्रोलियमच्या डिलरशीपचा उल्लेख शपथपत्रात केला आहे. २००९ ची विधानसभा निवडणूक लढताना अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी चव्हाण कुटुंबांची मालमत्ता २४ कोटी ६१ लाख होती. पाच वर्षांत त्यात १५ कोटींची वाढ झाली. सन २०१२-१३ या आर्थिक वर्षांत आयकर विभागाकडे दाखल केलेल्या विवरणानुसार चव्हाण यांचे वार्षिक उत्पन्न ३२ लाख ४२ हजार, तर अमिता यांचे १४ लाख ६३ हजार होते. हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून चव्हाण कुटुंबाचे याच काळातील उत्पन्न २८ कोटी ४५ लाख होते.
चव्हाण, त्यांच्या कुटुंबाची नांदेडच्या धनेगावपासून औरंगाबाद, पैठण, मुंबई व नवी दिल्लीपर्यंत मालमत्ता आहे. शेतजमिनीसोबत बिगर शेतजमीन, घरे व इतर इमारतींचा त्यांच्या मालमत्तेत समावेश आहे. अर्ज भरताना चव्हाण यांच्या हातावरील रोख ५६ हजार ५७३, तर सौ. चव्हाण यांच्याकडे फक्त २ हजार १३६ रुपये होते. चव्हाण यांच्या नावावर काही मालवाहू वाहने आहेत; पण गाडी किंवा जीप यापैकी एकही वाहन त्यांच्या नावावर नाही. सोने, दागिने व हिरे असे मिळून त्यांच्याकडे सुमारे ४२.५० लाख, तर सौ. चव्हाण यांच्याकडे ६४ लाख ५५ हजारांचा ऐवज आहे. त्यांच्या चल संपत्तीचे मूल्य १३ कोटी २७ लाख ४८ हजार रुपये दाखविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2014 1:50 am

Web Title: property of ashok chavan
Next Stories
1 ‘निवडणुकीचे काम नकोच’!
2 ‘बामू’च्या कुलगुरूपदाची विद्यासागर यांच्याकडे सूत्रे
3 आठवर्षीय मुलीवर अत्याचार; नराधमास उद्यापर्यंत कोठडी
Just Now!
X