03 August 2020

News Flash

सोलापूरचा पक्षी पर्यटन केंद्राचा प्रस्ताव सरकारदरबारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी हे पक्षीप्रेमी आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

एजाजहुसेन मुजावर, सोलापूर

एरवी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि जवळपास सपाट भूभाग असलेल्या सोलापुरात प्रचंड प्रमाणात स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी आढळून येतात. हजारो-लाखो किलोमीटर अंतरावरून येथे स्थलांतरित होणारे पक्षी पाहून दिवंगत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ तथा ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ डॉ. सलीमअली यांनी, ‘सोलापूर हे पक्ष्यांचे माहेरघर’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. सोलापुरातील पक्षीवैभव पाहून ते इतके  प्रभावित झाले होते की त्यांनी तीन ते चार वेळा येथे भेटी दिल्या होत्या. सध्या प्रदूषणाचा प्रश्न सार्वत्रिक स्वरूपात चर्चेत असला तरी सोलापूरचे हे पक्षवैभव आजही राजस्थानातील प्रसिद्ध अशा भरतपूरपेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचा विचार करूनच सोलापुरात पक्षी पर्यटन केंद्र मंजूर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे तीन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. दुर्दैवाने हा प्रस्ताव शासनाच्या दरबारी धूळ खात पडून आहे.

सोलापूर हे तसे धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पंढरपूर, अक्कलकोट, शेजारच्या तुळजापूर, गाणगापूर तसेच विजापूर येथे पर्यटनासाठी वर्षभरात सुमारे दोन कोटी पर्यटक येतात. त्या दृष्टीने पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. त्याचबरोबर पक्षी पर्यटन केंद्रासाठीदेखील सोलापुरात तेवढाच मोठा वाव आहे. सोलापुरातील ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश मेतन यांनी तीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे पक्षी पर्यटन केंद्राचा प्रस्ताव तयार करून सादर केला होता. मुंढे यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत नंतर थोडय़ाच दिवसात हा परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. परंतु दुर्दैवाने थोडय़ाच दिवसात मुंढे यांची सोलापुरातून बदली झाली आणि नंतर पक्षी पर्यटन केंद्राच्या प्रस्तावाची फाईल मंत्रालयात तशीच पडून राहिली. आज तर हा प्रस्ताव विस्मरणात गेला आहे की काय, अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी हे पक्षीप्रेमी आहेत. त्यांनी या बाबीकडे लक्ष दिल्यास त्याच्याच मूळच्या सोलापुरात पक्षी पर्यटन केंद्र उभे राहू शकेल.

केंद्र सरकारने सोलापूरचा यापूर्वीच स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणवून घेताना त्यास पूरक असलेले पक्षी पर्यटन केंद्रही उभे राहणे आवश्यक आहे. सोलापुरात मोगलकालीन कंबर तलाव (छत्रपती संभाजी महाराज तलाव) आजही अस्तित्वात आहे. एके काळी हा तलाव परिसर देशी-विदेशी पक्ष्यांसाठी हक्काचा होता. पर्यावरण राखण्याच्या दृष्टीने लक्ष देऊन काम झाल्यास या तलावाच्या भोवती सैबेरिया व अन्य दूरदूरच्या अंतरावरून अनेक दुर्मीळ पक्षी दाखल होतील. कंबर तलावाशिवाय शहराजवळ ब्रिटिशकालीन हिप्परगा तलावदेखील पक्ष्यांसाठी अतिशय महत्त्वाचे स्थळ मानले जाते. उजनी धरण जलाशय, मोहोळ तालुक्यातील आष्टी तलाव, अकलूज परिसर, मगराचे निमगाव, पंढरपूरचा यमाई तलाव, अक्कलकोटमधील कुरनूर धरण परिसर व अन्य भागात दरवर्षी शेकडो प्रजातींचे पक्षी येतात.

मोठय़ा प्रमाणात पक्षी

विहंग मंडळाने केलेल्या नोंदीनुसार सोलापूर व परिसरात २८४ प्रजातींचे पक्षी आढळतात. यात १६५ पक्षी स्थानिक प्रजातींचे तर ९४ पक्षी स्थलांतरीत प्रजातींचे आहेत. सैबेरिया व अन्य देशातून भारतात येणाऱ्या पक्ष्यांची संख्या मोठी आहे. यात लालसरी (पोकार्ड), मेलॉर्ड (चतुरंग), धापटय़ा (शोवलर डक), तलवार बदक (पीनटेल डक),चक्रांग (कॉमनटील),  टिबुकली (दाबचिक), भुवई बदक (गारगनीटील) आदी पक्षी दक्षिण, उत्तर व मध्य आशिया खंडातून येतात. रोहित (फ्लेमिंगो), अडई (लेसर व्हिसलिंग डक), दलदली तुतारी (मार्श सॅण्डपायवर),हिरवी तुतारी (ग्रीन सॅण्डपायपर), पाणघार (मार्श हॅरिअर), नीलकंठ (रोलर), थिरथिरा (रेडस्टार्ट), पाकोळ्या (स्विप्ट), भोरडय़ा (रेडस्टार्ट), धोबी (बॅगटेस) यासारखेही अनेक पक्षी येऊन दर्शन देतात. येथेच येऊन वास्तव्य करतात. ‘हिवाळी पाहुणे’ म्हणून आलेले हे पक्षी हिवाळा संपला की आपल्या मूळ ठिकाणी परत जातात. यात स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांपैकी प्रमुख आकर्षण असते ते रोहित पक्ष्यांचे अर्थातच फ्लेमिंगोंचे. नजाकतदार रंगसंगती लाभलेला हा प्रति राजहंस हिप्परगा जलाशयावर दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये न चुकता हजेरी लावतो. साधारणत: वर्षां ॠतू संपल्यानंतर शरद ॠतू सुरू होताच अनेक देशी-विदेशी पक्षी सोलापूरच्या परिसरात हमखास दिसू लागतात. सोलापूर जिल्ह्य़ात उजनी धरणासह भीमा, नीरा आणि सीना या तीन प्रमुख नद्यांसह ११४ छोटी-मोठी जलाशये आहेत. ओढे-नाले आहेत. पक्ष्यांसाठी हे वातावरण नैसर्गिकरीत्या पोषक आहे. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. तसे पाहता सोलापुरातील नान्नज येथील माळढोक अभयारण्य देशात प्रसिद्ध असले तरी अलीकडे मानवी अतिक्रमणामुळे येथील दुर्मीळ माळढोक पक्ष्याचे अस्तित्वच अधिक धोक्यात आले आहे. हे अभयारण्याचे जतन होणे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच येथे पक्षी पर्यटन केंद्राचीही उभारणी होणे ही अत्यावश्यक बाब ठरली आहे.

सोलापुरात हजारो-लाखो किलोमीटर अंतरावरून अनेक दुर्मीळ पक्षी न चुकता येतात. त्या दृष्टीने हे वैभव जतन करून ठेवण्यासाठी पक्षी पर्यटन केंद्र सुरू होण्याची नितांत आवश्यकता  आहे. त्यासाठी निसर्गप्रेमी व पक्षीमित्र तथा अभ्यासकांनी जनरेटा तयार करायला हवा. त्यासाठी सर्वाना अगोदर एकत्र यावे लागेल. राजस्थानातील भरतपूर येथील पक्षी पर्यटन केंद्रापेक्षा सोलापुरात पक्ष्यांसाठी अधिक पोषक वातावरण आहे. त्याचा योग्य लाभ घेणे जरुरीचे वाटते.

– डॉ. अरविंद कुंभार, पक्षीमित्र, अकलूज

सोलापूर हे देशी-विदेशी पक्ष्यांचे जणू नंदनवन आहे. राजस्थानातील भरतपूरपेक्षाही अधिक प्रजातीचे आणि दुर्मीळ पक्षी सोलापुरात वास्तव्यास येतात. हिप्परगा तलाव आणि कंबरतलाव हे पक्षीनिरीक्षणासाठी सर्वोत्तम स्थळ आहे. पक्ष्यांचे हे वैभव पाहता सोलापुरात पक्षी पर्यटन केंद्र सुरू होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर केला होता. त्यावर आपला पाठपुरावा सुरूच आहे. यात राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची जोड मिळाल्यास सोलापुरात पक्षी पर्यटन केंद्र सुरू होण्यास उशीर लागणार नाही.

– डॉ. व्यंकटेश मेतन, पक्षीमित्र, सोलापूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2018 12:05 am

Web Title: proposal for bird tourism center in solapur remain on paper
Next Stories
1 आष्टीत दोन भावंडांकडून मित्राचा खून
2 पाण्याअभावी मोरांवर स्थलांतराची वेळ
3 मुलीच्या लग्नादिवशीच पित्याची आत्महत्या
Just Now!
X