शहरातील महत्त्वपूर्ण ठिकाणांची रेकी करून बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचल्याच्या संशयावरून आंतरराष्ट्रीय दहशतवादी अबू जुंदालला शुक्रवारी येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करून ५७ पानी आरोपपत्र या न्यायालयात वर्ग करण्यात आले. २० फेब्रुवारीपासून या खटल्याचे काम सुरू होणार आहे.
सध्या आर्थररोड कारागृहात असलेल्या जुंदालला नाशिक येथील न्यायालयात हजर करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस अकादमी, पोलीस आयुक्तालय, तोफखाना स्कूल आदी संवेदनशील स्थळांची रेकी केल्याच्या प्रकरणात यापूर्वी बिलाल शेख आणि हिमायत बेग यांच्यावरील खटल्याची सुनावणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. या दोघांच्या मदतीने अबू जुंदालने पोलीस प्रशिक्षण केंद्र व तोफखाना दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला करण्याचा कट रचला होता. पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख संशयित हिमायत बेगला यापूर्वी तपास पथकाने ताब्यात घेतले होते. बिलालचे अन्य साथीदार तपास पथकाला सापडत नव्हते. दिल्ली पोलिसांनी जुंदालला अटक केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने तातडीने हालचाली करून त्याच्या ‘प्रोटेक्शन वॉरंट’साठी विनंती केली. बिलालने महत्त्वपूर्ण ठिकाणांची रेकी केल्यानंतर त्याला आरडीएक्स पाठविण्यात आले होते. याप्रकरणी जुंदालवरील आरोपपत्र गेल्या आठवडय़ात मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले होते. हे आरोपपत्र शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. यावेळी जुंदालला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात आणण्यात आले. या खटल्याची सुनावणी २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर हे काम पाहात आहेत.