News Flash

नालेगाव अमरधाममध्ये करोनामृतांवर अंत्यविधीस विरोध

या करोना रुग्णांच्या अंत्यविधीमुळे मोठय़ा प्रमाणात धुराचे साम्राज्य या परिसरात निर्माण होते.

नगर : शहराच्या मध्यवर्ती भागातील नालेगाव अमरधाममध्ये करोनाग्रस्तांवर अंत्यविधी करण्यास परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून तेथे करून तेथे करोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करावेत, अशी मागणी नगरसेवक अजय चितळे, शाम नळकांडे व गणेश वामन आदींनी केली आहे.

परिसरातील नगरसेवक व नागरिकांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, करोनाची दुसरी लाट भयंकर असल्यामुळे करोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात दररोज मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नालेगाव अमरधाम येथे मोठय़ा प्रमाणात अंत्यविधी होत आहेत. अमरधाम लगतच्या नालेगाव गावठाण, सुडकेमळा, बागरोजा हडको, दिल्ली गेट, पटवर्धन चौक, कल्याण रस्ता परिसर, ठाणगे मळा या परिसरात दाट लोकवस्ती आहे. या करोना रुग्णांच्या अंत्यविधीमुळे मोठय़ा प्रमाणात धुराचे साम्राज्य या परिसरात निर्माण होते. त्यामुळे अमरधामच्या आजूबाजूला असलेल्या परिसरातील नागरिकांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागते. यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिकेने कोविड रुग्णांच्या अंत्यविधीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.

ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही, अशा ठिकाणी ही जागा उपलब्ध करून द्यावी तसेच नालेगाव अमरधाम येथे फक्त करोना रुग्ण वगळता इतर अंत्यविधी या ठिकाणी करावेत अशी नागरिकांची मागणी आहे. गेल्या एक वर्षांपासून माणुसकीच्या भावनेतून परिसरातील नागरिक हा धुराचा व दुर्गंधीचा त्रास सहन करत आहेत. दररोज ६० ते ७० करोनाग्रस्तांवर एकाच वेळेस अंत्यसंस्कार या ठिकाणी केला जातो. ही परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. सावेडी उपनगरातील अमरधाममध्ये सर्व करोनाबाधित रुग्णांचा अंत्यविधी करावा, कारण त्या ठिकाणी आजूबाजूस दाट लोकवस्ती नाही. अशी मागणी त्यांनी केली. या वेळी संतोष लांडे, वैभव वाघ, राम वाघ, विकी वाघ, गणेश कुलथे, दीपक घोडेकर, सागर कदम, सचिन मुदगल, सनी आगरकर, सुनील दाते, अमोल कवडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कारामुळे निर्माण झालेला ताण लक्षात घेऊन काही अंत्यविधी सावेडी उपनगरासह केडगाव, नागापूर येथील अमरधाममध्ये केले जात आहेत. विद्युतदाहिनीची व्यवस्था केवळ नालेगाव अमरधाममध्येच आहे. करोनाग्रस्तावर अंत्यविधी  केडगाव उपनगरातील अमरधाममध्ये करण्यास तेथील नागरिकांनीही विरोध केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:09 am

Web Title: protest against funeral of corona pateints at nalegaon amardham zws 70
Next Stories
1 नगरच्या कुमुदिनीला भुईकोट किल्लय़ात मानाचे स्थान!
2 नीहार भावेच्या लघुपटास राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकासह एक लाखांचे बक्षीस
3 टाळेबंदीचा गैरफायदा घेत अनधिकृत मोबाइल टॉवर उभारणी
Just Now!
X