भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे व कामगार, कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावरील कोल्हापूरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. हल्लेखोरांना येत्या ७२ तासांत अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी झालेल्या निषेध सभेत विविध वक्त्यांनी दिला. या वेळी राज्य सरकारचाही निषेध करण्यात आला.
महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा समजला जातो, मात्र डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या व कॉ. पानसरे यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याने पुरोगामित्वावर व कायद्याच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. परिवर्तनवादी शक्ती व नेत्यांशी वैचारिक लढाई वैचारिक पातळीवर लढता येत नसल्यानेच त्यांना संपवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होताना दिसतो. दाभोलकर व माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या गेल्या तीन वर्षांत झालेल्या हत्यांचा शोध सरकारला लावता आलेला नाही. पानसरे यांच्यावरील हल्ल्याचे असे होऊ नये. हल्लेखोरांचा तपास न लागल्यास येत्या २३ फेब्रुवारीपासून कार्यकर्ते सत्याग्रह करतील, असा इशारा या वेळी देण्यात आला.
कॉ. बाबा आरगडे, शंकरराव घुले, कॉ. सुधीर टोकेकर, डॉ. गिरीश कुलकर्णी, कॉ. अनंत लोखंडे, कॉ. आनंद वायकर, संदीप सकट, नानासाहेब कदम, अॅड. निर्मला चौधरी, नीलिमा बंडेलू, कुणाल शिरसाठ, बाळासाहेब कांबळे, रोहित परदेशी, शाकिर शेख, पोपट जाधव आदी उपस्थित होते. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.