वेळेवर बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाविरोधात रोष निर्माण झाला आहे. अनेक महिन्यांपासून जामठी ते धाड बस चालू करावी यासाठी विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांकडे अनेक तक्रारी दिल्या तरीही बस चालू केली नाही. यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे जामठी, अटकळ, चौथा, गिरडा, पाडळी येथील विद्यार्थ्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभाराबद्दल सोमवारी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राणा चंदन यांच्या नेतृत्वाखाली आगारप्रमुखांना घेराव घातला.
विद्यार्थ्यांनी एस.टी.पासेस काढलेल्या असताना त्यांना वेळेवर बस का देत नाही, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान झाले तर याला जबाबदार आगारप्रमुख राहतील, असे सांगून तात्काळ जामठी ते धाड बस सुरू करा अन्यथा, एकही बस जामठी ते धाड मार्गे चालू देणार नाही, असा इशारा राणा चंदन यांनी यावेळी दिला. विद्यार्थ्यांचा रोष पाहून आगारप्रमुख साळवे यांनी दोन दिवसात बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात स्वाभिमानीचे अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हा अध्यक्ष शेख रफिक शेख करीम, गणेश नप्ते, समाधान गायकवाड, विठ्ठल नप्ते, गजानन गायकवाड, अमोल गायकवाड, तुषार पवार, प्रल्हाद नप्ते, अभिषेक तांगडे, एकनाथ गायकवाड, गोपाल गुल्हे, अक्षय गायकवाड, दीपक नप्ते, ज्ञानेश्वर गायकवाड, शिवशंकर गायकवाड यांच्यासह चौथा, अटकळ, गिरडा, दहिद येथील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.