राज्य स्थापना दिनाच्याबरोबरीने ठिकठिकाणी निषेध दिन

महाराष्ट्र दिन चिरायू होवो.. जय जय महाराष्ट्र.. अशा घोषणा देत शहरातील शासकीय, निमशासकीय आणि राजकीय संस्थांनी विविध भागात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला, तर विदर्भवादी आणि महाराष्ट्रवादी यांच्यामध्ये पुन्हा एकदा अस्मितेची लढाई दिसून आली. विदर्भ राज्याच्या मागणीची हाक संपूर्ण देशात जावी, यासाठी विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने ध्वजारोहण, रक्ताक्षरी मोहीम, आंदोलन करण्यात आले, तर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह विदर्भातील सर्व मंत्री, खासदार, आमदारांना वेगळे विदर्भ राज्य केव्हा देता, असा भ्रमणध्वनी करून जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोर पकडल्यापासून नागपुरात १ मे या राज्य स्थापनेच्या दिवशी महाराष्ट्रवादी आणि विदर्भवादी संघटनांकडून स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळीही हीच परंपरा कायम होती.

विदर्भवाद्यांनी विविध प्रकारचे आंदोलने करून स्वतंत्र राज्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले, तर संयुक्त महाराष्ट्रवादी संघटनांनी राज्य स्थापनेचा वर्धापनदिन जल्लोशात साजरा केला.

राज्याच्या ५७ वा स्थापन दिनाचा मुख्य सोहळा कस्तुरचंद पार्क मैदानात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

अखंड महाराष्ट्र समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापना दिन व मराठी अस्मिता दिन साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या ग्रंथालयाजवळील सेनापती बापट यांच्या पुतळ्याला ज्येष्ठ साहित्यिक वि.स. जोग आणि यज्ञवल्य जिचकार यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष मधुकर कुकडे, प्रमोद सोवनी आदी मान्यवर आणि महाराष्ट्रवादी उपस्थित होते.

शिवसेनेतर्फे शहरातील विविध भागातील चौकात जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नागरिकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लक्ष्मीभवन चौकात प्रदेश उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वाखाली फटाक्याची आतषबाजी करीत राज्याचा स्थापन दिन साजरा करण्यात आला. स्वतंत्र विदर्भाच्या नेत्यांचा निषेध करीत राज्याचा स्थापन दिन साजरा केला.

विदर्भवाद्यांकडून महाराष्ट्र दिनाचा निषेध

विदर्भातील विविध जिल्ह्य़ात स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत विविध विदर्भवादी संघटनांनी ध्वजारोहण करून विदर्भ राज्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले. आंदोलन, निदर्शने करून महाराष्ट्र दिनाचा निषेध केला. विदर्भ कनेक्ट (व्हीकॅन) या संघटनेतर्फे बजाजनगरातील ‘विष्णू की रसोई’मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि मार्गदर्शक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या हस्ते विदर्भध्वज फडकावण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, जनमंचचे प्रमोद पांडे, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, दिनेश नायडू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती, संजय सिंगलकर, अ‍ॅड. नीता सिंगलकर, अ‍ॅड. मिर्झा, देवेंद्र पारेख आदी उपस्थित होते. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसह विदर्भातील सर्व मंत्री, खासदार, आमदारांना दूरध्वनी करून वेगळ्या राज्याची निर्मिती केव्हा करता, अशी विचारणा केली.

काही कार्यकर्त्यांनी लक्ष्मीभवन चौकात निदर्शने केली. यावेळी नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी तो हाणून पाडला. अहमद कादर, सुनील चोखारे, अफजल खान यांच्यासह आठ ते दहा विदर्भवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या घराकडे कूच करीत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने रक्ताक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रक्ताक्षरी करून या मोहिमेला प्रारंभ केला. या मोहिमे अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या रक्तांकित स्वाक्षरीचे पत्र पाठविले जाणार आहे. या निवेदनाला दहा हजारांपेक्षा जास्त रक्ताक्षरी केलेल्या स्वाक्षऱ्या जोडण्यात येईल. विदर्भातील अकरा जिल्ह्य़ात ही मोहीम राबविली जात आहे.

पहिल्यांदाच अकरा जिल्ह्य़ातील १२४ तालुक्यात विदर्भाचा झेंडा फडकविण्यात आला आहे. विदर्भाचे आंदोलन थांबणार नाही. १ मे काळा दिवस म्हणून आम्ही पाळतो. विदर्भवादी नेते भाजपकडून अपेक्षा ठेवून होते. निवडणुकीच्या आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्यावेळी स्वतंत्र विदर्भाची भाषा केली होती. मात्र आज त्यांनी भूमिका बदलविली. 

– अ‍ॅड. श्रीहरी अणे, अध्यक्ष विदर्भ राज्य आघाडी