हजारो कोटी रुपये कमावणाऱ्या सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ देऊन भारताच्या खऱ्या रत्नांचा अपमान झाला असून त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो, असे प्रतिपादन शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले.
तालुक्यातील पढेगाव येथे आदिवासी प्रबोधन सेवा संघाच्या वतीने आयोजित आदिवासी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मूलनिवासी आदिवासी महासभेचे राष्ट्रीय संयोजक भास्कर वाकडे, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन उदमले, अशोक नाईक, धनंजय कानगुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सावंत म्हणाले, सरकारने आत्तापर्यंत एकाही सैनिकाला ‘भारतरत्न’ दिले नाही. सचिनला ‘भारतरत्न’ देण्यामागे उद्योगपती अंबानीचा हात आहे, त्यामुळे ते योग्य नाही. ते   म्हणाले, आदिवासी समाज हा निसर्गाच्या नियमानुसार वागणारा समाज आहे. आदिवासींनी इंग्रजांशी झुंज देऊन त्यांच्या नाकी नऊ आणले. परंतु इतिहासात त्यांच्या पराक्रमाची नोंद घेतली गेली नाही. आदिवासी वर्षांनुवर्षे जंगलात राहतात, त्यामुळे जंगलावर पहिला अधिकार आदिवासींचा आहे. मात्र आज आदिवासींना विस्थापित करून त्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट सरकारने घातला आहे. महागाई वाढते आहे. यात गरीब होरपळून निघतो आहे.