केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रीतसर संमती दिल्यानंतरच आपण त्यांच्या जीवनावर ‘घे झेप पाखरा’ हा चित्रपट निर्माण केला. परंतु आता सुशीलकुमार शिंदे यांनी सुचविलेल्याप्रमाणे अनेक बदल करूनदेखील हा चित्रपट प्रदर्शित करण्यास त्यांच्याकडून मान्यता मिळत नाही. त्यामुळे आपले मोठे नुकसान होत असल्याची तक्रार करीत अभिनेते व दिग्दर्शक रमेश व्हटकर  ऊर्फ रॉकसन यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
 वीरशैव कक्कय्या ढोर समाजात जन्म झालेल्या व अंधारातून प्रकाशाकडे यशस्वीपणे वाटचाल करून राज्य व देशाच्या राजकारणात मोठी झेप घेतलेले केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जीवनगाथा संघर्षांची व युवा पिढीला सतत प्रेरणा देणारी आहे. ‘तुफानातील दिवे’ म्हणून त्यांचे कार्यकर्तृत्व सर्वाना सुपरिचित आहे. त्यांच्या जीवनावर बेतलेला ‘घे झेप पाखरा’ या नावाचा चित्रपट रॉकसन यांनी निर्माण केला आहे.
त्यासाठी शिंदे यांच्याकडून रीतसर परवानगी घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे, तर शिंदे यांनी अनेक बदल सुचविले व त्यानुसार आपण चित्रपटात बदल केले. परंतु तरीही शिंदे हे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देत नाहीत, असा आक्षेप रॉकसन यांनी घेतला आहे. यात साडेचार वर्षांचा कालावधी गेला व आपले सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याची त्यांची तक्रार आहे. त्याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी रॉकसन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याच मागणीसाठी येत्या ११ जानेवारी रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करणार असून त्याचीही दखल घेतली न गेल्यास येत्या २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत इंडिया गेटसमोर आत्मदहन करण्याचा इशाराही रॉकसन यांनी दिला आहे.