द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी देशभरातील कोटय़वधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांविषयी केलेल्या बेताल व्यक्तव्याचे शिर्डीत तीव्र पडसाद उमटले. साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांनी स्वामींच्या या  बेताल वक्तव्याचा  निषेध व्यक्त केला.
    सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांविषयी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा आज शिर्डीत भाविक व ग्रामस्थांनी तीव्र  निषेध व्यक्त करत ही बेताल व्यक्तव्ये मागे घेऊन माफी मागावी अशी एकमुखी मागणी केली.  स्वामींनी अगोदर साईबाबा व त्यांच्या साईचरित्राचा अभ्यास करावा व मगच साईबाबांविषयी बोलावे असे साईभक्त  व शिर्डी ग्रामस्थांनी म्हटले आहे.
    साईभक्त व शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर याबाबत म्हणाले की साईबाबांवर आमची अपार श्रध्दा आहे. साईमंदिर हिंदू व मुस्लिम समाज व इतरधर्मीयांचे ऐक्याचे प्रतीक  समजले जाते. साईबाबांनी ६० वर्षे शिर्डीत घालवली. गोरगरीब, दीनदुबळ्यांची सेवा केली. आजही साईबाबा भक्तांच्या हाकेला धावून येतात. देशविदेशातील करोडो भाविकांचे ते श्रध्दास्थान आहे.  स्वामींच्या या विधानाने भाविकांच्या श्रध्देला तडा गेल्याचे सांगत अशोक खांबेकर यांनी स्वामींचा तीव्र शब्दांत निषेध केला.
    शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास (बापू) कोते म्हणाले की साईबाबा हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. देशविदेशातील करोडो भाविक येथे नतमस्तक होतात. बाबांची १०० वर्षांची समाधी आहे. साईबाबा देव आहे की नाही हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची किंवा महाराजांची गरज नाही. स्वामी स्वरूपानंदांनी असे उद्योग करू नयेत. स्वामीं स्वरूपानंदांच्या या बेताल वक्तव्याचा आम्ही  सर्व शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त तीव्र निषेध करतो अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.